वाटाणा, गाजराची उडाली घसरगुंडी; वाढत्या थंडीमुळे भाजीपाल्यांच्या भावांमध्ये घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 07:18 AM2022-12-24T07:18:25+5:302022-12-24T07:18:53+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. मार्केटमध्ये
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. मार्केटमध्ये तब्बल ४८१ टन वाटाणा व ३५० टन गाजराची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे त्यांचे दर घसरू लागले आहेत. गवार, कोथिंबिर व पालेभाज्यांचे दर मात्र काही प्रमाणात वाढले आहेत.
बाजार समितीमध्ये शुक्रवारी ४ लाख ६३ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली. मध्य प्रदेशमधून प्रतिदिन ४०० टन पेक्षा जास्त वाटाण्याची आवक होत आहे. शुक्रवारी ४८१ टन आवक झाल्याने बाजारभाव २६ ते ३२ वरून २२ ते २८ वर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा ३० ते ४० रुपयांना विकला जात आहे. गाजराचाही हंगाम सुरू झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये १६ ते २४ व किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
पालेभाज्यांचा दर वधारला
पालेभाज्यांची आवक कमी होऊ लागली आहे. कोथिंबीर ६ ते १६ रुपये जुडीवरून १० ते ३० रुपये जुडी दराने विकली जात आहे. मेथी ७ ते १४ वरून ७ ते ३० रुपये व शेपू ८ ते १६ वरून ८ ते २० रुपये झाली आहे.