नवी मुंबई- नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याची माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याला होकार असल्याचं सांगितलं आहे.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिल्यानंतर मनसेचे नेते राजू पाटील यांनी ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे यांचा ग्रीन सिग्नल, तो ही सरकार अल्पमतात आल्यावर? असो, तरीही या भूमिकेचे मनापासून स्वागतच. पण आधीच ही भूमिका घेतली असती तर…आम्हा दिबा प्रेमी भूमिपुत्रांची लाखोंचे मोर्चे काढत झालेली वणवण वाचली असती, असं राजू पाटलांनी म्हटलं आहे.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त करीत आहेत. याबाबत अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर सेना व प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण झालेला असल्याचे पाहायला देखील मिळाले आहे. या मागणीबाबत स्थानिक पनवेल उरण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज (२८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे या भूमिकेवर शिवसेना ठाम होती. मात्र आज शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिबा यांच्या नावाला होकार दिल्याचा दावा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला होकार दिल्याच्या दाव्याच्या वृत्तानंतर प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांनी जो लढा उभारला त्याला एका अर्थी यश आल्याची भावना दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.