नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक मंगळवारी निम्म्यावर आली. किरकोळ मार्केटमध्ये कोथिंबिर जुडी ८० तर कांदा ६० रुपयांवर पोहचला आहे. पालेभाज्यांचा आकार लहान झाला असून एक जुडीसाठी २५ ते ३५ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईत प्रतिदिन ६५० ते ७०० ट्रक, टेंपोमधून भाजीपाल्याची आवक होते. दररोज जवळपास साडेतीन हजार टन भाजीपाला आणि ६ ते ७ लाख जुडी पालेभाज्यांची आवश्यकता असते. परंतु मंगळवारी ५९५ वाहनांद्वारे केवळ साडेचार लाख जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे.घाऊक बाजारात कोथिंबिरी जुडी ३५ ते ६० रुपये व किरकोळ बाजारात ८० रुपयांनी विकली जात आहे. घाऊक बाजारात मेथी १५ ते ३०, पालक १० ते ३०, शेपू १० ते १८ रुपये जुडी दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात या जुडीचे दोन किंवा तीन भाग करून २५ ते ३५ रुपये दराने विकल्या जात आहे. कांदा ६० रुपये दराने विकला जात आहे. राज्यात झालेला अवकाळी पाऊस व नंतर सुरू झालेल्या ऑक्टोबर हीट यामुळे आवक कमी होऊन दर वाढू लागले आहेत. पुढील पूर्ण आठवडा मार्केटमधील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालेभाज्यांच्या जुडीचा आकार झाला कमीमहागाईमुळे पालेभाज्यांच्या जुडीचा आकार कमी होऊ लागला आहे. घाऊक बाजारातच प्रतिजुडी १५ ते ३० रुपये दर द्यावा लागत आहे. कोथिंबिरीची जुडी घाऊक बाजारात ३५ ते ६० रुपयांवर गेली आहे. यामुळे किरकोळ विक्रेते घाऊक बाजारातील जुडीचे दोन किंवा तीन भाग करून त्याची विक्री करत आहेत.
कोथिंबिरीसह पालेभाज्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर; भाजीपाल्याची आवक आली निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 9:37 AM