नवी मुंबई : नेरुळ येथील सागर ज्ञानोबा वाघमोडे हा विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग २०१७च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून गेल्या दोन दिवसांपूर्वीच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. प्रोव्हीजनल लिस्टमध्ये सागरचा ३८ वा क्रमांक असून या परीक्षेत १०३८वा रँक मिळाला आहे. वडील ज्ञानोबा वाघमोडे हे पोलीस निरीक्षक असून आपल्या मुलाने सनदी अधिकारी व्हावे असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. सागरला आयपीएस अधिकारी व्हायचे असून त्याकरिता तो कसून मेहनत घेत असल्याचे त्याने सांगितले.सागरने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर काही महिने नोकरी करून त्याने परीक्षेच्या तयारीसाठी नोकरी सोडली. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळाले असून आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचेही सागरने स्पष्ट केले. सरावाला अतिशय महत्त्व असून तणावविरहित अभ्यास केल्यास नक्कीच यश प्राप्त करता येईल असा मोलाचा सल्ला दिला. काँग्रेस नवी मुंबईचे इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी देखील सागरला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्या कुटुंबीयांचे देखील अभिनंदन केले. यावेळी विद्या भांडेकर, संतोष पोळ, सुधीर पांचाळ, राजन सावंत आदी उपस्थित होते. ३ जून रोजी सागर पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा देणार असून आणखी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.
सागर वाघमोडेवर अभिनंदनाचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 2:52 AM