घणसोली नोडचा लवकरच मेकओव्हर, महापालिका विकासाचा बॅकलॉग भरून काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:09 AM2017-10-03T02:09:42+5:302017-10-03T02:09:54+5:30
घणसोली नोडमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. रोड, गटार, जलवाहिनी, मलनि:सारण केंद्रासह पथदिवे बसविण्याची कामे करण्यात येणार आहेत
नामदेव मोरे
नवी मुंबई : घणसोली नोडमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. रोड, गटार, जलवाहिनी, मलनि:सारण केंद्रासह पथदिवे बसविण्याची कामे करण्यात येणार आहेत. तब्बल ८५ कोटी ९९ लाखांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून घणसोलीचा विकासाचा बॅकलॉग भरून निघणार आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेकडून नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यात येत आहेत. परंतु घणसोली नोड सिडकोच्या ताब्यात असल्यामुळे या परिसरातील विकासाची सर्व कामे दहा वर्षांपासून ठप्प झाली होती. रस्ते, गटारांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी घणसोली नोड सिडकोकडून हस्तांतर करून घेण्यात आला आहे. हस्तांतरणानंतर विकासकामांना गती देण्यास सुरुवात झाली आहे. एकात्मिक विकासांतर्गत पूर्ण घणसोली नोडमधील कामे करण्यासाठीच्या ७ प्रस्तावांना नुकतीच सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. घणसोली सेक्टर १ ते ७ व सेक्टर ९ मधील पावसाळी गटारांचे व पदपथांची कामे करण्यासाठी ५१ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. रोड, गटारांसह सर्व प्रकारची कामे करण्यात येत आहेत. घणसोली नोडमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनीही समाधान व्यक्त केले आहे.
गोठीवली गावाच्या परिसरातील घणसोली नोडचे काम करण्यासाठी माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी नोड हस्तांतर होण्यापूर्वीपासून प्रयत्न सुरू केले होते. सिडकोकडून ११ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरीही घेतली होती. नोड हस्तांतर झाल्यानंतर महापालिकेकडून पाठपुरावा करून तेथील विकासकामांना गती दिली आहे.
घणसोलीमधील भाजपाचे पदाधिकारी कृष्णा पाटील यांनीही विकासकामांसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. विद्यमान भाजपा नगरसेविका उषा पाटील, शिवसेना नगरसेवक प्रशांत पाटील, कमलताई पाटील, सुवर्णा पाटील, दीपाली सुरेश संकपाळ, शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर, राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक घनशाम मढवी, सीमा गायकवाड, निवृत्ती जगताप यांनीही सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यमान आयुक्त रामास्वामी एन यांनी घणसोली नोडची पाहणी करून अत्यावश्यक कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. या प्रस्तावांना मंजुरी दिली असून निविदा प्रक्रियेसाठीची कार्यवाही सुरू केली आहे. घणसोलीमधील नागरिक दहा वर्षांपेक्षा जास्त काळ पालिकेला मालमत्ता कर भरत होते परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना काहीच होत नव्हता. विकासकामांना शुभारंभ होत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने विकासाच्या रूपात दिवाळी भेट दिल्याचे बोलले जात आहे.
सेक्टर ८ साठी ६ कोटी
घणसोली सेक्टर ८ मधील रोडवर कर्बस्टोन बसविणे, पॅराबोलिक कर्बस्टोन लेन, पदपथ, पावसाळी गटारे, युटिलीटी डक्ट, जलवाहिनी बदलणे, मलनिस:रण वाहिनी टाकण्याची कामे केली जाणार आहेत. यासाठी ६ कोटी ९६ लाख रुपये खर्च होणार आहेत.
बसडेपोजवळ युटिलीटी डक्ट
घणसोली सेक्टर १५ मधील बसडेपोजवळील रस्त्यालगतच्या रोडची दुरवस्था झाली आहे. रोडनजीक पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटारांचे बांधकाम केले आहे. परंतु युटिलीटी डक्ट बनविण्यात आलेले नाहीत. भविष्यात सर्व्हिस युटिलीटी टाकण्यासाठी रस्ता खोदाई टाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस डक्ट बनविण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी ४३ लाख रुपयांच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
पावसाळी गटारांसाठी ५१ कोटी
घणसोली सेक्टर १ ते ७ व सेक्टर ९ मधील पावसाळी गटार व पदपथांची कामे करण्यासाठीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. रस्ते, पावसाळी गटार, पदपथ, युटिलीटी डक्टची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ५१ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनचा वसाहतीमधील प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
सेक्टर १५ ते २२ साठी २ कोटी ८१ लाख
घणसोली सेक्टर १५ ते २२ पर्यंतच्या रोडचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय जुना कल्व्हर्ट नादुरुस्त झाला असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्या ठिकाणी येथील रोडची सुधारणा करण्यात येणार आहे. या परिसरामधील उर्वरित रोडची कामेही केली जाणार असून त्यासाठी २ कोटी ८१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
सेक्टर २१ साठी ११ कोटी
घणसोली सेक्टर २१ मधील रोड, कर्बस्टोन व इतर कामे करणे, पदपथ, पावसाळी ड्रेन, युटिलीटी डक्ट, जलवाहिनी, मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. पूर्ण परिसरातील कामे करण्यासाठीच्या ११ कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
गोठिवलीमध्ये मलउदंचन केंद्र
रबाळे व गोठिवली गाव परिसरामध्ये मलवाहिन्या टाकण्याचे व मलउदंचन केंद्र बांधण्यात येणार आहे. परिसरामध्ये २०० व ६०० मि.मी. व्यासाच्या ३५०० मीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकणे. चेंबर्स, मॅनहोल, बांधणे, खोदलेल्या चरांचे पुनर्पृष्ठीकरण करणे, आवश्यकतेनुसार काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ८ कोटी ५४ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.