उद्यानात मद्यपान करणाऱ्यांची धरपकड
By Admin | Published: December 23, 2016 03:28 AM2016-12-23T03:28:52+5:302016-12-23T03:28:52+5:30
सार्वजनिक ठिकाणी उद्यानांमध्ये मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १८ जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली
नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी उद्यानांमध्ये मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १८ जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष पथक तयार करून पोलिसांनी परिसरातील उद्यानांची व मैदानांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये उद्यानात चालणारे गैरप्रकार उघडकीस आले आहेत.
उद्यानात व खेळाच्या मैदानात गर्दुल्ल्यांचा वावर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. या गर्दुल्ल्यांमुळे सर्वसामान्यांना उद्यानात जायचे टाळावे लागत होते. रात्रीच्या वेळी हे गर्दुल्ले नशेमध्ये एखाद्या महिला किंवा मुलीची छेड काढण्याचेही प्रकार घडण्याची शक्यता असायची. काही ठिकाणी छेडाछाडीचे असे प्रकार घडले देखील आहेत. कोपरखैरणे सेक्टर ५ ते ८, १ ते ४, १५ ते १८ व ४ ए याठिकाणची उद्याने रहिवासी क्षेत्रात आहेत. त्याठिकाणी परिसरातील लहानथोर सकाळ, संध्याकाळी विरंगुळ्याच्या उद्देशाने जमतात. परंतु अशा उद्यानांचा वापर गर्दुल्ल्यांकडून मद्यपान अथवा अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी केला जायचा. यामुळे त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी काही महिला, पुरुषांना उद्यानात जायचे बंद करावे लागले आहे. तर खेळाच्या मैदानात बसणाऱ्या गर्दुल्ल्यांकडून टाकल्या जाणाऱ्या बाटल्यांचा खच साचल्याने मैदानांची दुरवस्था झालेली आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दोन पथके तयार केली आहेत. त्यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, पाच सहाय्यक निरीक्षक व २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून मागील दोन दिवसांत परिसरातील उद्याने व खेळाच्या मैदानांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी १८ जणांवर सार्वजनिक ठिकाणी व्यसन केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. पकडलेल्या अनेकांकडे चरस, गांजा यासह व्हाईटनर असे नशेसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यापैकी काहींना न्यायालयाने वैयक्तिक १५ हजार रुपयांच्या जातमुचल्यावर सुटका केली आहे. ही कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये कायद्याचा वचक निर्माण केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)