किराणा दुकानदाराला घातला १.६५ कोटींचा गंडा; शेअर मार्केटमध्ये दाखवले ६६ कोटींचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:11 IST2024-12-30T14:10:20+5:302024-12-30T14:11:01+5:30
...मात्र, दुकानदाराला एक रुपयाही न देता प्रत्यक्षात १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

किराणा दुकानदाराला घातला १.६५ कोटींचा गंडा; शेअर मार्केटमध्ये दाखवले ६६ कोटींचे आमिष
नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या किराणा दुकानदाराला शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दोन महिने गुंतवणूक केल्यानंतर ६६ कोटी ३२ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, दुकानदाराला एक रुपयाही न देता प्रत्यक्षात १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
फसवणूक झालेल्या एस. बी. आरेठीया या व्यावसायिकाचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुकान आहे. २१ ऑक्टोबरला मोबाइलवर शेअर्स मार्केटसंदर्भात व्हिडीओ पाहत असताना त्यांना एक लिंक निदर्शनास आली. त्यावर क्लिक केल्यानंतर एक व्हॉटस्ॲप ग्रुपवर त्यांचा समावेश करून घेण्यात आला. तेथे शेअर्स मार्केटमध्ये कोणाला किती लाभ झाला याची माहिती सांगितली जात होती. एक दिवस ग्रुपवरील एका महिलेचा त्यांना फोन आला व त्यांना शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत केले.
आणखी ३ कोटी जमा करा
- २१ ऑक्टोबर ते २७ डिसेंबरदरम्यान त्यांनी टप्प्याटप्प्याने १ कोटी ६५ लाखांची गुंतवणूक केली. त्यांना ६६ कोटी ३२ लाख ६६ हजार रुपयांचा लाभ झाल्याचे ऑनलाइन दाखविले.
- यानंतर त्यांना फोन करून ममता मशिनरीचा आयपीओ लागला असल्याचे सांगून ३ कोटी जमा करण्यास सांगितले. समोरील व्यक्ती पैसे भरण्यासाठी आग्रह केल्यानंतर संशय आला. मित्रांशी चर्चा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.