अलिबागमध्ये भीषण पाणीटंचाई
By admin | Published: May 1, 2017 06:39 AM2017-05-01T06:39:36+5:302017-05-01T06:39:36+5:30
उन्हाचे चटके असह्य होत असतानाच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. जिल्ह्याची
अलिबाग : उन्हाचे चटके असह्य होत असतानाच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. जिल्ह्याची राजधानी असणाऱ्या अलिबाग तालुक्यात पाणीटंचाईचे भयावह चित्र दिसत आहे. पाणीपुरवठा योजना एकीकडे फोल ठरल्या, तर दुसरीकडे विहिरी आणि धरणेही कोरडी पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे खासगी टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्यांचे मात्र चांगलेच फावत आहे.
तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये सुमारे पाच दिवस आड नळाला पाणी येते. त्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड अडचण झाली आहे. पाणीटंचाईचे हे चित्र दरवर्षी खंडाळे गावात अनुभवण्यास मिळते. गावात पाणीयोजना राबविण्यात आली असली, तरी तेथील नागरिकांच्या नशिबी असणारी पाणीटंचाई काही संपलेली नाही. गावात पुरेसे पाणी मिळत नसल्याने काही महिला या जवळील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधून दीड किलोमीटरची पायपीट करून पाण्याची व्यवस्था करीत आहेत. काही नागरिक खासगी टँकरने पाणी विकत घेत आहेत. ज्यांना विकत घेणे परवडते ते घेतात; परंतु ज्यांना पाणी विकत घेता येत नाही. त्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र आहे. खंडाळा गावापासून जवळच असणाऱ्या सागरगड आदिवासीवाडीवरही अशीच परिस्थिती आहे. वाडीवर असणाऱ्या विहिंरीनी तळ गाठला आहे. त्या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसले, तरी तहान भागविण्यासाठी तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.
तालुक्यातील तीनविरा धरणाच्या माध्यमातून परिसरातील २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. उन्हाच्या झळा कमालीच्या असल्याने या धरणांनी तळ गाठायला सुरु वात केली आहे. त्यामुळे पाणीकपातीचे धोरण राबवून आठवड्याचे दोन दिवस या २२ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उर्वरित दिवशी पाणीपुरवठा सुरू असला, तरी होणारा पाणीपुरवठा हा अनियमित आणि कमी दाबाने करण्यात येत आहे. हाशिवरे ग्रामपंचायतीमधील महिलांना पाण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. येथे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या झऱ्यातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. गावातील बोअरवेलला पाणी नसल्याने या झऱ्याचे पाणी महिलांना भरावे लागत आहे. (प्रतिनिधी)
पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
बोडणी येथील नागरिकांना खासगी टँकरचालकांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. टेम्पोमधून आजूबाजूच्या गावांमधून हजार लिटर पाण्याच्या टाक्या भरून पाणी आणले जात आहे. या गावातील नागरिकांना हजार लिटर पाण्यासाठी तीनशे रु पये मोजावे लागत आहेत.
रामराज परिसरातील उमटे धरणातूनही आठवड्यातील दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात येत नाही. हे धरण जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. जो काही पाणीपुरवठा करण्यात येतो. तोही अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याचे उमटे धरणावर पाणी शुद्धीकरण प्रकल्प नसल्याने आम्हाला शुद्ध पाणीच मिळत नाही, असे अॅड. कौस्तुभ पुनकर यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यामध्ये पाणीटंचाईचे भीषण वास्तव आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, तसेच त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.