गट, गणातील अनेकांचा मोर्चा प्रभागाकडे
By admin | Published: January 4, 2017 05:09 AM2017-01-04T05:09:13+5:302017-01-04T05:09:13+5:30
पनवेल शहर महानगरपालिका स्थापन झाल्याने महानगरात ग्रामीण भागाचा समावेश झाला आहे. यामुळे ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. याच कारणाने आता
कळंबोली : पनवेल शहर महानगरपालिका स्थापन झाल्याने महानगरात ग्रामीण भागाचा समावेश झाला आहे. यामुळे ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. याच कारणाने आता गण आणि गटातील लढणारे इच्छुक प्रभागात लढण्याची तयारी करू लागले आहेत. काहींची उमेदवारी जवळपास निश्चित झाली तर काहींचे नेत्यांकडे हेलपाटे वाढवले आहेत. याचा परिणाम ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर जाणवू लागला आहे. तिथे उमेदवारीची शोधाशोध केली जात आहे.
पूर्वी पनवेल नगरपरिषद फक्त पनवेल शहर, नवीन नोडपुरती मर्यादित होती. उर्वरित ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद होती. खारघरसारख्या सायबर सिटीत राहणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीतील रहिवाशांना सुध्दा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान करावे लागत होते. एकंदरीत याबाबत शहरी मतदार कमालीचे नाराज होते. त्यांची उदासीनता मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत असे. आता पनवेल महापालिका झाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. तर त्यापेक्षा जास्त उत्साह राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर झाले असून आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या संपर्ककार्यालयापासून ते विविध कार्यक्र मांची घोडदौड सुरू झाली आहे.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे गण आणि गट महापालिकेमुळे कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत काहीशी उदासीनता दिसून येत आहे. पूर्वी नावडे विभागात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली जायची, आता हा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्यासह इतर सदस्य महापालिका लढवणार आहेत. तीच परिस्थिती कळंबोली, कामोठे वसाहतीत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम या कळंबोलीतील असल्याने त्या महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. माजी पंचायत समिती सभापती, उपसभापती, चंद्रकला शेळके, गोपाळ भगत, प्रमोद भगत, सखाराम पाटील यांचे गण सुध्दा महापालिकेत आले आहेत. त्यामुळे तेही प्रभागवासी झाले आहेत. आत्माराम पाटील यांनी रोडपाली विकास आघाडीची स्थापना केली असून महापालिकेच्या रिंगणात ते उतरणार आहेत.
- दोन-अडीच वर्षांपासून पंचायत समितीत सत्ताधारी आणि प्रशासनाला नीलेश पाटील यांनी सळो की पळो करून सोडले. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेल्या त्यांनी मोमीनपाडा येथे जनसंपर्ककार्यालय सुरू केले आहे.