‘ग्रो मोअर फूड्स’ला ठेकेदारांकडून हरताळ;दूषित पाण्यावर पिकतोय भाज्यांचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:06 AM2019-05-16T01:06:25+5:302019-05-16T01:07:03+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळालगतच्या मोकळ्या जागा पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रो मोअर फूड्स योजनेअंतर्गत ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत.

'Grow More Foods' contract workers' rust; | ‘ग्रो मोअर फूड्स’ला ठेकेदारांकडून हरताळ;दूषित पाण्यावर पिकतोय भाज्यांचा मळा

‘ग्रो मोअर फूड्स’ला ठेकेदारांकडून हरताळ;दूषित पाण्यावर पिकतोय भाज्यांचा मळा

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळालगतच्या मोकळ्या जागा पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रो मोअर फूड्स योजनेअंतर्गत ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र या ठेकेदारांच्या माध्यमातून भाजी लागवडीसाठी गटारांतील दूषित पाणी वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईत सुद्धा हा प्रकार सर्रासपणे सुरू असून त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे प्रशासनाने ग्रो मोअर फूड्स योजनेअंतर्गत नवी मुंबईतील बेलापूर ते वाशी आणि जुईनगर ते ठाणे दरम्यानच्या रेल्वेमार्गालगतच्या मोकळ्या जागा पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी ठेकेदारांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात पालेभाज्या पिकविल्या जातात. या भाज्या शहरात अगदी स्वस्तात विकल्या जातात. विशेष म्हणजे या भाज्या पिकविण्यासाठी अत्यंत दूषित पाणी वापरले जात असल्याचे दिसून आले आहे.
अनेक ठिकाणी मोठ्या नाल्यातील पाणी मोटरपंपच्या साहाय्याने या भाजीच्या मळ्याला पुरविले जाते. तर तुर्भे ते ऐरोली दरम्यानच्या रेल्वेमार्गालगत पालेभाज्यांच्या लागवडीसाठी रसायन मिश्रित दूषित पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. एमआयडीसीतील अनेक कंपन्या रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करताच लहान-मोठ्या नाल्यातून खाडीत सोडतात. या नाल्यातील दूषित पाणी भाजीचे मळे पिकविण्यासाठी वापरले जात आहे. अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी खेचण्यासाठी डिझेलवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. तर कोपरी येथील रेल्वेरुळालगतच्या शेतीसाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. दूषित पाण्यावर पालक, मुळा, मेथी आदी पालेभाज्या पिकविल्या जातात.
या भाज्या शहरातील किरकोळ विक्रेते, हॉटेल्स चालकांना थेट पुरविल्या जातात. शेजारच्या एपीएमसीमधील घाऊक मार्केटपेक्षा या भाज्या ताज्या व स्वस्त असल्याने अनेक किरकोळ विक्रेते सकाळी थेट रेल्वमार्गावर येवून भाजी खरेदी करतात. या भाज्यांची विक्री प्रामुख्याने रेल्वे स्थानकाबाहेर, लोकलमध्ये, शहरातील दैनंदिन बाजार, पदपथावरील फेरीवाल्यांकडून केली जाते.
या भाज्या दूषित पाण्यावर पिकविल्या जात असल्याने त्या आरोग्यास अपायकारक आहेत. यात लोह, झिंक आणि कार्बाईड आॅक्साईडचे अंश मोठ्या प्रमाणात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या भाज्या आरोग्यास अत्यंत घातक असल्याचा निर्वाळा वेळोवेळी वैद्यकीय सल्लागारांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सुरू असलेल्या विषारी पालेभाज्यांच्या लागवडीला आळा घालण्याचे आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.

रेल्वेमार्गालगतच्या मोकळ्या जागेत पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांसाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते, याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तसेच लागवडीसाठी दूषित पाण्याचा वापर केला जात असल्यास संबंधित ठेकेदाराला समज द्या, किंबहुना त्याचा परवाना रद्द करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून नवी मुंबईतील पालेभाज्यांच्या दूषित शेतीची चौकशी होणार का, असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: 'Grow More Foods' contract workers' rust;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.