प्राची सोनवणे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका शाळांच्या पटसंख्येत गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. शहरात खासगी शाळांचे पेव वाढत असले तरी प्रवेशासाठी होणारी चढाओढ, भरमसाट फीवाढ, सततच्या स्पर्धांमुळे पालक-शाळा व्यवस्थापनातील वाद वाढत आहेत. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे महापालिका शाळांनी दर्जेदार शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकवर्गाचा कल वाढला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५३ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या ११७२ ने वाढली आहे. तर १७ माध्यमिक शाळांमधील पटसंख्या ५६१ने वाढली आहे. ५३ बालवाड्यांमधील पटसंख्येतही १८८५ने वाढ झाली आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले असून, शासन निर्णयानुसार शैक्षणिक साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.सर्व शिक्षण अभियानांतर्गत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात ३९७.६५ लक्ष एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत समूह साधन केंद्र, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन व मूल्यमापन, लोकप्रतिनिधी प्रशिक्षण, मोफत पाठ्यपुस्तक आदी योजना राबविल्या जात आहेत. तसेच समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना सामान्य शाळेत प्रवेश दिला जात आहे. महापालिका क्षेत्रात ३८ खासगी अनुदानित शाळांची संख्या आहे, तर खासगी अंशत: अनुदानित शाळांची संख्या १०, खासगी विनाअनुदानित शाळा २८ आणि खासगी कायम विनाअनुदानित शाळा १११ इतक्या असून, यामध्ये इंगजी माध्यमातील शाळांचा समावेश आहे. शाळेतील निकालाची गुणवत्ताही वाढत असून, यंदा दहावीचा निकाल ८७.२० टक्के इतका लागला. यंदा २१११ विद्यार्थी दहावीला बसले होते. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला ९२.२० टक्के गुण मिळाले. 1महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढण्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, शिक्षक, मुख्याध्यापकांना दिले जाणारे प्रशिक्षण,अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांना दिला जाणारा वाव, क्षेत्रभेटी आदी माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जात आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी व्यक्त केली. 2गेल्या काही महिन्यांपूर्वीच ‘क्षेत्रभेट’ या उपक्रमांतर्गत महापालिकेतील शिक्षकांनी साताऱ्याच्या निकमवाडी येथील शाळेला भेट देऊन, त्या ठिकाणी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली, असेही संगवी यांनी स्पष्ट केले. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी बसविले जात असून, या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी महापालिकेच्या वतीने भरली जाते. 3स्कॉलरशीपला बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग राबविले जातात. महापालिका शाळांमधील १८ मैदाने विकसित करण्यात आली असून, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरी बजावता यावी, चांगले प्रशिक्षण मिळावे, याकरिता प्रयत्न केले जातात.
महापालिका शाळांच्या पटसंख्येत वाढ
By admin | Published: June 19, 2017 5:11 AM