पनवेल - पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले अनुदान त्वरित मिळावे, यासाठी पालिकेच्याशिष्टमंडळाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची २५ जून रोजी यांची भेट घेतली.पनवेल महानगरपालिका १ आॅक्टोबर २०१६ रोजी स्थापन झाली. १ जुलै २०१७ पासून राज्यात एलबीटी बंद करण्यात येऊन नवीन जीएसटी प्रणाली सुरू करण्यात आली. महापालिकांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाने महापालिकांना जीएसटीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु पनवेल महापालिकेला आजपर्यंत जीएसटीचे अनुदान मिळाले नाही. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेने या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.स्थानिक निधी लेखा शाखेने प्रमाणित केल्यानुसार व महापालिका प्रशासनाने ९ मे २०१९ रोजी मागणी केल्यानुसार प्रलंबित ४६६.४० कोटी आणि चालू वर्षातील दरमहा २४.७७ कोटी जीएसटीचे अनुदान महापालिकेला लवकर मिळावे, अशी पुनर्मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेला मिळणार जीएसटीचे अनुदान, अर्थमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:30 AM