"जीएसटी म्हणजे गुड अँड सिंपल टॅक्स"; सीए विमल जैन यांनी सांगितले GST चे सामान्यांशी नाते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 07:10 PM2023-11-07T19:10:40+5:302023-11-07T19:11:34+5:30
ICAI च्या नवी मुंबई शाखेच्या बैठकीत पदाधिकारी, तज्ज्ञांकडून सदस्यांना विशेष मार्गदर्शन
वाशी, नवी मुंबई: GST ही क्लिष्ट प्रकारची करप्रणाली नसून ती अतिशय सहज आणि सोपी करप्रणाली आहे. GST म्हणजे Good & Simple Tax असे म्हणता येईल. जीएसटी कौन्सिल वेळोवेळी विविध बदल आणि कायद्यांतील सुधारणा सुचवत असते. या बदलाने सीए प्रोफेशनल लोकांना थोडे जास्त श्रम पडतात. पण तसे असले तरी या सुधारणा देशाच्या जडणघडणीसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाच्या असतात. जीएसी करप्रणाली क्लिष्ट आहे असे तेच लोक म्हणतात ज्यांना करचोरी करणं हा उद्देश असतो. पण जे नित्यनेमाने योग्य पद्धतीने आपले व्यवहार करतात, त्यांच्यासाठी जीएसटी म्हणजे सरळ आणि सोपी पद्धत आहे, अशा शब्दांत सीए बिमल जैन यांनी आज (४ नोव्हेंबर) उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले.
सीए विमल पुनमिया आणि सीए विजय मंत्री यांनीही आजच्या कार्यक्रमात सदस्यांना खास विषयांवर मार्गदर्शन केले. कॅपिटल मार्केटचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असलेला परिणाम, देशात आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये कॅपिटल मार्केट कशा प्रकारची भूमिका बजावेल याबाबत विजय मंत्री यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय, सीए विमल पुनमिया यांनी मृत्यूपत्र, नॉमिनेशन मधील तांत्रिक बाबी आणि वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचे हक्क या विषयावर माहिती दिली. प्रत्येक स्थितीत कोणत्या व्यक्तीचे काय अधिकार असू शकतात यावर त्यांनी मार्गदर्शन केले आणि सभासद सदस्यांच्या अडचणींचे निवारण केले.
फोटोमध्ये (डावीकडून) वेस्टर्न रिजनचे सचिव सौरभ अजमेरा, चेअरमन अर्पित काबरा, नवी मुंबई शाखेचे चेअरमन हर्षल अजमेरा
भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट संघटनेचा (The institute of chartered accountants of india) म्हणजेच ICAI च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम शनिवारी, ४ नोव्हेंबरला नवी मुंबईत पार पडला. वाशीच्या तुंगा हॉटेलमध्ये नवी मुंबई शाखेच्या वतीने WIRC च्या सर्व सभासद-सदस्यांची पदाधिकाऱ्यांशी एक बैठक झाली. वेस्टर्न रिजनचे चेअरमन अर्पित काबरा, सचिव सौरभ अजमेरा, खजिनदार केतन सैया, नवी मुंबई शाखेचे चेअरमन हर्षल अजमेरा, उपाध्यक्ष निलेश बजाज, ब्रँच नॉमिनी संजय निकम या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. ठराविक कालावधीच्या अंतराने हे संघटनेचे पदाधिकारी विविध शाखांच्या सदस्यांची भेट घेत असतात आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आजदेखील नवी मुंबईतील बैठकीत दोनही शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून आपल्या संघटनेच्या नवी मुंबई शाखेच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांने नव्या बदलांबाबत तसेच नियमांबाबत मार्गदर्शन केले.