जिल्हाबंदीमुळे प्रवेशमार्गावर पहारा; विनाकारण फिरणारे आल्या मार्गी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 10:51 PM2021-04-25T22:51:12+5:302021-04-25T22:51:40+5:30
टोल नाक्यावरील कोंडी फुटली : विनाकारण फिरणारे आल्या मार्गी परत
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : जिल्हाबंदी आदेश लागू झाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश मार्गावर नाकाबंदी लावली आहे. त्याठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवेचा ई-पास अथवा प्रवासाचे ठोस कारण असलेल्या व्यक्तींनाच सोडले जात आहे. या आदेशामुळे मुंबईत प्रवेशाच्या मार्गावर असलेल्या वाशी टोलनाक्यावरील गर्दी मंदावली असून, ती २५ टक्क्यांवर आली आहे.
सध्या अत्यावश्यक सेवेतील वाहने व कर्मचारी यांच्यासह प्रवासाचे ठोस कारण असलेल्या व्यक्तींनाच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची मुभा दिली जात आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांकडून मुंबई मार्गावर वाशी टोलनाका, ठाणे मार्गावर मुकुंद नाका, शिळफाटा मार्गावर तसेच गोवा मार्गावर आपटा, जुन्या पुणे मार्गावर शेडुंग फाटा व महामार्गावर कळंबोली येथे वाहनांची झाडाझडती सुरू आहे.
प्रत्येक वाहन अडवून प्रवासाचे कारण तपासले जात आहे. तर, विनाकारण प्रवास करताना आढळणाऱ्यांना परत पाठवले जात आहे, तर परवानगीपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. नाकाबंदीत पोलिसांचा फौजफाटा बघूनदेखील अनेक जण आल्या मार्गी परत जात आहेत. परिणामी, सर्वच ठिकाणी नियमितपेक्षा मोठ्या प्रमाणात वाहतूक मंदावली असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.