गांजाविक्रेत्याला सुरक्षारक्षकांनी पकडले, एपीएमसीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:36 AM2017-12-10T06:36:44+5:302017-12-10T06:36:56+5:30

टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच एपीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले. सुरक्षारक्षकांनी सापळा रचून गांजाविक्री करणा-या पंकजकुमार गुप्ताला पकडले.

 The guard was caught by the guards, APMC type | गांजाविक्रेत्याला सुरक्षारक्षकांनी पकडले, एपीएमसीतील प्रकार

गांजाविक्रेत्याला सुरक्षारक्षकांनी पकडले, एपीएमसीतील प्रकार

Next

नामदेव मोरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच एपीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले. सुरक्षारक्षकांनी सापळा रचून गांजाविक्री करणा-या पंकजकुमार गुप्ताला पकडले. त्याच्याकडे गांजाच्या सात पुड्या आढळून आल्या. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल करून अटक करण्याऐवजी सोडून दिले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटमध्ये टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. ५ ते ७ तरुणांवर गांजाविक्रीची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येकाला रोज १५ ते २० पुड्या विक्रीसाठी दिल्या जातात. मार्केटच्या सहा नंबर गेटजवळील पानटपरीजवळ गांजाविक्रीचा अड्डा सुरू असल्याचे स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी केले. दोन व्हिडीओमध्ये या ठिकाणी खुलेआम गांजाविक्री केली जात आहे. याशिवाय विक्री करणारेही आणि मार्केटमध्येच गांजा ओढला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याविषयीचे वृत्त शनिवारच्या अंकामध्ये ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे बाजारसमितीमध्ये खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षकांनी सकाळीच या परिसरामध्ये सापळा रचला. संशयास्पदरीत्या फिरणाºया पंकजकुमार गुप्ता या तरुणाला ताब्यात घेतले. त्याला सुरक्षारक्षक कार्यालयात आणून खिशात काय आहे, ते दाखविण्यास सांगितले. त्याने पँटच्या दोन्ही खिशांमध्ये गांजाच्या सात पुड्या ठेवल्या होत्या. याशिवाय गांजा ओढण्यासाठीची चिलीमही आढळून आली. सुरक्षारक्षकांनी सर्व प्रकार चित्रित केला. या प्रकाराची त्यांच्याकडील डायरीमध्ये नोंद केली व पंकजकुमारला एपीएमसी पोलिसांच्या हवाली केले.
एपीएमसी पोलिसांच्या बिट मार्शलनी जप्त केलेला गांजा व संशयिताला पोलीस स्टेशनला नेले. सकाळी ७ वाजता ही कारवाई करण्यात आली. ९ वाजण्याच्या सुमारास संशयिताला पोलिसांच्या हवाली करण्यात आले; परंतु रात्री ८ वाजेपर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल केलेला नव्हता. पोलिसांनी जुजबी चौकशी करून त्याला सोडून दिले. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर आरोपी तरुणाने सुरक्षारक्षकांच्या कार्यालयात जाऊन, ‘तुम्ही मला पकडून दिले त्याचे काय झाले?’ असे सुनावून तेथून निघून जाणे पसंत केले. आरोपी तरुणाकडे गांजाच्या सात पुड्या सापडल्यानंतरही तत्काळ गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला असता, अशाप्रकारे कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विक्रेत्यांनी
केले पलायन
‘लोकमत’चे वृत्त प्रसिद्ध होताच गांजाविक्री करणारे तरुण व त्यांच्या म्होरक्याने मार्केटमधून पळ काढला. ‘हºया मामासाठी आम्ही काम करत असून, तो १० वाजेपर्यंत येईल,’ असे पकडलेल्या आरोपीने सांगितले; परंतु हºया मामा दिवसभर मार्केटमध्ये फिरकलाच नाही. या वृत्ताची दखल घेऊन अमली पदार्थ विरोधी पथक व एपीएमसी पोलिसांनीही मार्केटमध्ये हजेरी लावली होती.

सुरक्षारक्षकांचे कौतुक
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील सुरक्षा अधिकारी भीमराव पाटील, ए. एस. तांबे, संदीप महाजन, डी. जे. हुलवले, ए. एन. माने व इतर कर्मचाºयांनी गांजाविक्रेत्याला पकडले. त्याच्याकडून गांजाच्या सात पुड्याही हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे सुरक्षारक्षकांचे कौतुक केले जात आहे.

आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
एपीएमसीच्या सुरक्षारक्षकांनी गांजाविक्री करणाºया पंकजकुमार गुप्ताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सात गांजा पुड्या व चिलीम सापडली. याविषयीचा व्हिडीओ मार्केटमध्ये प्रसारित झाला आहे. सुरक्षारक्षकांनी, ‘कोणासाठी काम करतो?’ अशी विचारणा केली असता, ‘हºया मामासाठी काम करतो’ असे आरोपीने सांगितले. ‘हºया मामा १५ ते २५ पुड्या आणून देतात, त्या आम्ही विकतो. यासाठी रोज ३०० रुपये मिळतात’, असेही त्याने सांगितले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संबंधितावर गुन्हा दाखल झाला का? या विषयी विचारणा करण्यास सुरुवात केली आहे; पण प्रत्यक्षात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title:  The guard was caught by the guards, APMC type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.