- मधुकर ठाकूर
उरण: उरण शहरातील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस करण्यात आलेली कपात कमी करुन रविवारी पाणी पुरवठा करण्याचे आदेश रायगडाचे पालक मंत्री उदय सामंत एमआयडीसीला दिलं आहेत. उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची पाणीपातळी खालावली आहे.त्यामुळे उरण एमआयडीसीने ऐन उन्हाळ्यातच मागील दोन महिन्यांपासून आठवड्यातून तीन दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद करून पाणी कपात केली आहे. यामुळे मात्र उरण शहराला पाणी टंचाईने ग्रासले आहे.
पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी एमआयडीसीला पत्र देऊन आठवड्यातील बंद करण्यात आलेल्या तीन दिवसांपैकी रविवारी एक दिवस पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी उरण एमआयडीसीला लेखी पत्राद्वारे केली होती. तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी यांची भेट घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी विनंतीही केली होती. मात्र त्यानंतरही एमआयडीसीकडून सकारात्मक मिळाला नाही. त्यामुळे उरण शहरातील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती केली होती.बालदी यांच्या विनंतीवरून उदय यांनी मंत्रालयात बैठक बोलाविली होती.
मंत्र्यांच्या दालनात शुक्रवारी (३) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर , भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, उरण नगरपालिकेचे अभियंता झुंबर माने आदी उपस्थितीत होते. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत रानसई धरणातून उरण शहराकरिता दर रविवारी पाणीपुरवठा सुरू ठेवणेबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला आदेश दिले आहेत.त्यामुळे येत्या रविवार पासून दर रविवारी पाणीपुरवठा थोड्या फार प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी व्यक्त केला आहे.