पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:10 AM2021-05-14T10:10:02+5:302021-05-14T10:11:25+5:30
शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले.
नवीन पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पनवेल येथील फडके नाट्यगृह येथे कोरोनासंदर्भातील आढावा घेतला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, आमदार बाळाराम पाटील, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले, ललिता बाबर, तहसीलदार विजय तळेकर आदी उपस्थित होते.
शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले. सिडकोच्या माध्यमातून जम्बो सेंटर चालू आहे. त्यामध्ये किमान शंभर बेड तरी लहान मुलांसाठी ठेवायला हवेत, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. महापालिकेला पेडियाट्रिक डॉक्टरसोबत संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले असून, जेणेकरून आपण तिसऱ्या लाटेचा सामना करू शकू. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पुढच्या तयारीच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तसेच कंटेनमेंट झोनमध्ये सर्व गोष्टींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. पनवेल परिसरात कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अदिती तटकरे यानी केले. जे नागरिक दुसऱ्या डोससाठी तयार आहेत, त्यांना संपर्क करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सुधाकर देशमुख, आमदार बाळाराम पाटील यांनी कोरोनासंदर्भातील माहिती या आढावा बैठकीत दिली.