पाहुण्या पक्ष्यांनी गजबजला उरण परिसर
By admin | Published: January 30, 2017 02:12 AM2017-01-30T02:12:36+5:302017-01-30T02:12:36+5:30
ऐन थंडीत उरण परिसरातील झाडेझुडपे, बागबगिचे, गवताळ शेती, बांबूचे वन आणि समुद्र किनाऱ्यांवरील वाळूवर गेल्या काही दिवसांपासून अनाहुत पाहुण्या पक्ष्यांची गर्दी वाढली आहे
मधुकर ठाकूर, उरण
ऐन थंडीत उरण परिसरातील झाडेझुडपे, बागबगिचे, गवताळ शेती, बांबूचे वन आणि समुद्र किनाऱ्यांवरील वाळूवर गेल्या काही दिवसांपासून अनाहुत पाहुण्या पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. स्वैरविहार करणाऱ्या रंगीबेरंगी विविध जातीच्या पक्ष्यांच्या मनमोहक हालचालीने परिसरातील वातावरणही चांगलेच प्रफुल्लित झाले आहे.
उरण परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढते. त्यामध्ये अग्निपंखी आणि जलचर पक्ष्यांची संख्या अधिक असते. मात्र जलाशये, खाड्या भरावयात बुजविल्या गेल्याने मागील दोन-तीन वर्षांपासून फ्लेमिंगो आणि इतर जलचर पक्षी उरण परिसरात येईनासे झाल्याने या पक्ष्यांचे दर्शन जवळपास दुर्मीळ झाले आहे. हिवाळ्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. उरण परिसरातील झाडेझुडपे, बागबगिचे, गवताळ शेती, बांबूचे वन आणि समुद्र किनाऱ्यांवरील वाळूवर विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात नजरेस पडू लागले आहेत. या आकर्षक अनाहुत पाहुण्या पक्ष्यांची गर्दी परिसरात वाढली आहे. यामध्ये लाल मुनिया, चिमणी सुगरण, गुलाबी पिंच, कालशीर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट,करडा धोबी, चेस्टनट पोटाचा नटहॅच, फुलटोच्या गप्पीदास, राखी वटवट्या, शिंपी, कस्तुर, टकाचोर, राखी खाटीक, छोटा हिरवा राघू, तांबट, हरतालिका, नीलकंठ, खंड्या, भारव्दाज, सिगल आदि छोट्या - मोठ्या आकाराच्या पक्ष्यांचा समावेश आहे.
काही जातीचे पक्षी कळपा-कळपाने विहार करताना दिसत आहेत. काही जातीच्या पक्ष्यांचा रंग सभोवतालच्या परिस्थितीही जुळणारा असतो. त्यामुळे असे पक्षी चटकन नजरेला दिसत नाहीत.मोकळ्या किंवा दाट झाडाझुडपांतही विविधरंगी बहुरंगी पक्ष्यांचे थवेही नजरेस पडतात. काही जातीचे पक्षी उजाड शेती आणि माळरानातही आढळून येत आहेत. असे छोट्या-मोठ्या आकाराचे पक्षी विशिष्ट आवाजाने हमखास वाटसरूंचे लक्ष वेधून घेतात. चराऊ रानेही पक्ष्यांची आवडती ठिकाणे आहेत. विपुल प्रमाणात मिळणारे भक्ष्य आणि निसर्गाच्या सान्निध्यातही मोठ्या प्रमाणात पक्षी वास्तव्य करून असतात.