नवी मुंबई : सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजीत शिवआधार स्पर्धा परीक्षा उपक्रमामध्ये ४२ शाळांमधील १६६१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीरे आयोजीत करण्यात आले होते. आजी - माजी सनदी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्तरेकडील व दक्षीणेकडील राज्यांमधील तरूण प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वेतील क्लॉर्क ते आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही याच राज्यांमधील टक्केवारी अधिक आहे. तेथे प्राथमीक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांविषयी मार्गदर्शन करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतही या परीक्षांविषयी फारशी माहिती नसते. यामुळे गुणवत्ता असूनही अद्याप प्रशासकिय सेवेतील टक्का कमी आहे. हा टक्का वाढावा यासाठी शिवसेना नगरसेवक संजू आधार वाडे यांनी सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शिवआधार स्पर्धा परिक्षा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील खाजगी व महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देण्यात आली. तज्ज्ञांकडून स्पर्धा परिक्षेचे महत्व व अभ्यास कसा करायचा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पाचवी ते सहावी, सातवी व आठवी, ९ वी दहावी , ११ वी १२वी व एफ. वाय. ते पदवी अशा पाच गटामध्ये ही परीक्षा घेण्यात आली. तब्बल १६६१६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी मानवता संघटना, पतंजली योगा गृप, ज्येष्ठ नागरीक संघटना, रिक्षा चालक मालक संघटना, यु.पी. बिहार संघटना, मुस्लीम संघटना, जयभीम मित्र मंडळ, जेष्ठ नागरीक संघटनांनी स्वेच्छेने सहभाग घेतला होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, विजय नाहटा, विजय चौगुले, प्रकाश बावीस्कर, शाळांमधील शिक्षक, मुख्याद्यापक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
१६,६१६ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
By admin | Published: January 24, 2017 6:03 AM