महापालिका मुख्यालयात सेवापुस्तकाविषयी मार्गदर्शन
By योगेश पिंगळे | Published: March 2, 2024 05:12 PM2024-03-02T17:12:19+5:302024-03-02T17:12:52+5:30
सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांच्या सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकविषयक एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.
योगेश पिंगळे, नवी मुंबई : सेवापुस्तक हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कारकिर्दीचा आरसा असल्याने सेवापुस्तक व सेवानिवृत्ती वेतनविषयक माहितीपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. त्याचा उपयोग कामकाजात करावा, असे आवाहन प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी केले. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाजातील ज्ञान अद्ययावत होण्यासाठी सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांच्या सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकविषयक एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.
महानगरपालिकेच्या विविध विभागांतील प्रशासकीय कामकाज व त्यातही सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकविषयक कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शासकीय नियमांचा व त्यांच्या अंमलबजावणीचा प्रदीर्घ अनुभव असणारे महाराष्ट्र शासनाच्या वित्तविभागाचे सेवानिवृत्त उपसचिव चौधरी यांनी या प्रशिक्षण वर्गात दैनंदिन कामकाजातील अनेक उदाहरणे देत, महाराष्ट्र नागरी सेवा नियम सोपा करून सांगितला. महापालिका प्रशासन विभागाच्या वतीने दोन सत्रांत आयोजित प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये चौधरी यांनी आपले सेवापुस्तक कर्मचाऱ्यांनी कसे अद्ययावत करायचे, याची माहिती दिली.