नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सीपीआयच्या सलग सात विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली. तसेच गुजरातमधील सर्वात मोठ्या विजयाची नोंदही केली. दरम्यान, या निवडणुकीतून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. आम आदमी पक्षाने पाच जागा जिंकल्या. तसेच तब्बल १३ टक्के मते मिळवली.
आम आदमी पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी दोन जागांवर भाजपा, दोन जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भारतीय ट्राइबल पक्षाने विजय मिळवला होता. गुजरातमधील ३५ जागा अशा आहेत जिथे आप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर ३९ जागा अशा होत्या जिथे काँग्रेसचा पराभव झाला आणि आपला मताधिक्यापेक्षा अधिक मते मिळाली. म्हणजेच इथे आप आणि काँग्रेसच्या उमेदवारंच्या मतांची बेरीज ही विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा अधिक होती.
या निवडणुकीत आपने १८१ उमेदवार उभे केले होते. आपला मिळालेल्या एकूण मतांपैकी ५० टक्क्यांहून अधिक मते ही त्यांना ३८ जागांवर मिळाली आहेत. तर आपच्या १२६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डेडियापाडा मतदारसंघात आपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. या मतदारसंघात आपचे चैतर वसावा यांनी विजय मिळवला. जामजोधपूर येथून हेमंत अहिर यांनी माजी मंत्री चिमण सापारिया यांना पराभूत केले. बोटाद येथून आपचे उमेदवार उमेश मकवाना यांनी विजय मिळवला. तर विसावदर येथून भूपेंद्रभाई यांनी विजय मिळवला. तर गारियाधार येथून आपचे उमेदवार सुधीर वाघानी यांनी भाजपाच्या केशुभाई नाकराणी यांना पराभूत केले.
आता गुजरातच्या निवडणुकीनंतर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. सध्या आपकडे दिल्ली, पंजाब आणि गोव्यामध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे. तसेच गुजरातमधील आदिवासी भागात आपने एंट्री मिळवली आहे. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा मतदारसंघातून आपचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याने आता आप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अधिक शक्तीने उतरण्याची शक्यता आहे.