गुजरातचा निर्णायक विजय हुकला
By admin | Published: November 17, 2016 05:37 AM2016-11-17T05:37:09+5:302016-11-17T05:37:09+5:30
गुजरातच्या आवाक्यात आलेला विजय निसटल्याने सामना अनिर्णीत ठेवण्यात मध्यप्रदेशच्या खेळाडूंना यश आले.
नागोठणे : येथील रिलायन्सच्या मैदानावर झालेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश संघामधील रणजी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्याच्या चौथ्या दिवशी गुजरातने मध्यप्रदेश संघापुढे ३७५ धावांचे आव्हान ठेवले होते. मध्यप्रदेशचे ४ खेळाडू अवघ्या ३६ धावांवर तंबूत परतल्याने गुजरातचा विजय निश्चित समजला जात होता. मात्र, नमन ओझाच्या जोडीला सहाव्या क्रमांकावर आलेल्या हरप्रीतसिंग भाटिया या जोडीने फटकेबाजी करीत संघाच्या धावांना आकार देत खेळी करीत ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्याने गुजरातच्या आवाक्यात आलेला विजय निसटल्याने सामना अनिर्णीत ठेवण्यात मध्यप्रदेशच्या खेळाडूंना यश आले. पहिल्या डावातील आघाडीमुळे गुजरातला ३, तर मध्यप्रदेशला १ गुण मिळाला. नाबाद १३९ धावांची खेळी करणाऱ्या पार्थिव पटेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
गुजरातने बुधवारी सकाळी मंगळवारच्या २ बाद २२८ धावांवर खेळ चालू केला. संघाच्या गुणफलकात १७ धावांची भर टाकून २४५ धावांवर समीत गोहीलने आपला बळी दिला. त्याने या डावात १०४ धावांची शतकी खेळी केली. आणखी ४८ धावांची भर टाकून ३ फलंदाज बाद झाल्याने कर्णधार पार्थिव पटेलने ६ बाद ३२४ धावांवर संघाचा डाव घोषित करून मध्यप्रदेशच्या संघापुढे विजयासाठी ३७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या डावात पटेलने बहारदार अशी नाबाद १३९ धावांची खेळी केली. मध्यप्रदेशचा जलदगती गोलंदाज ईश्वर पांडेने ४, चंद्रकांत साकुरे आणि हरप्रीतसिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
मध्यप्रदेशच्या संघाने दुसरा डाव चालू केला असता ५ धावांवरच सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत धाडण्यात गुजरातच्या फलंदाजांना यश आले होते. त्यानंतर पुन्हा संघाच्या फलकावर ३६ धावा लागलेल्या असताना पुन्हा २ बळी मिळाल्याने चहापानापूर्वी गुजरातच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, नमन ओझाच्या जोडीला आलेल्या हरप्रीतसिंग भाटियाने फटकेबाजी करीत खेळ चालू ठेवल्याने चहापानानंतर १ तासाने १४९ धावांवर नमन ओझाची वैयक्तिक ५२ धावांवर विकेट पडली.
शेवटच्या दीड तासात मँडेटरी ओव्हर चालू झाल्यानंतर १० षटकांमध्ये एकही विकेट न पडल्याने १० षटके शिल्लक असताना दोन्ही कर्णधारांच्या सल्ल्याने सामना थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या डावात गुजरातच्या रु श कलारियाने ४, तर बुमराह आणि फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने प्रत्येकी १ बळी घेतला. सामन्यात पंच म्हणून के. श्रीनिवासन आणि ए. पद्मनाभन, मॅच रेफ्री कर्नल संजय वर्मा, तर स्कोअरर म्हणून विश्वास घोसाळकर, मंगेश नाईक यांनी काम पाहिले. (वार्ताहर)