प्राची सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुजरातच्या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. सध्या दिवसाला १० हजार पेट्यांची आवक केली जात आहे. रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याच्या सिझनचा हा शेवटचा आठवडा असून गुजरातच्या आंब्याला वाढती मागणी आहे. हापूसपाठोपाठ केसर आंब्याला ग्राहकांची पसंती आहे. मेअखेरीस कोकणातील हापूस आंब्याचा सिझन संपत असल्याने लांबड्या केसर आंब्याची आवक वाढत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कर्नाटकी हापूसचीही आवक घटली असून आणखी काही दिवसच या आंब्याची चव चाखता येणार आहे. पावसाळ्यात हापूस आंबा खाल्ला जात नसून या दरम्यान गुजरातच्या केशरला वाढती मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. गुजरातच्या जुनागड, वलसाड, वापी, धरमपूर, देगाम येथून मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची आवक होत असल्याची माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. आठवडाभरात गुजरातच्या आंब्याची आवक आणखी वाढणार असल्याचे ते म्हणाले. घाऊक बाजारात गुजरातचा केशर ५० ते ६० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो दर आहेत. पुढील आठवड्यात आवक वाढल्यानंतर दर कमी होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. केशरबरोबरच बाजारात राजापुरी आंबादेखील बाजारात दाखल झाला आहे. आंबा घाऊक बाजारात ३५ रुपये किलोने उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात ४५ ते ६० रुपये किलो दराने हा आंबा विक्रीस उपलब्ध आहे. या आठवड्यात उत्तरप्रदेशातील आंबेही बाजारात दाखल होतील.
गुजरातचा हापूस बाजारात
By admin | Published: May 22, 2017 2:26 AM