गुणाले तलाव बनलेय वॉशिंग सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:29 AM2021-01-12T00:29:04+5:302021-01-12T00:29:22+5:30

घणसोलीतील प्रकार : सुरक्षारक्षक गायब, तळीरामांचे आश्रयस्थान; दुर्गंधीयुक्त पाणी

Gunale Lake has become a washing center | गुणाले तलाव बनलेय वॉशिंग सेंटर

गुणाले तलाव बनलेय वॉशिंग सेंटर

Next

अनंत पाटील

नवी मुंबई : तलाव व्हिजनअंतर्गत महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून एकूण २४ तलावांपैकी १८ तलावांचे सुशोभीकरण केले आहे. त्यातील घणसोली गावातील गुणाले तलावाची पार दुरवस्था झाली आहे. तलावाच्या बाजूला वाहने धुण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून या तलावांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकण्यात येत असल्यामुळे जलप्रदूषित दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेकदा मासळी मरण्याच्या अनेक घटना घडत आहेत. केरकचरा आणि निर्माल्याच्या ढिगाऱ्यामुळे अक्षरश: स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे फुसका बार असल्याची टीका होत आहे. लॉकडाऊन कालावधीत ५५ लाख रुपये खर्चून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आल्यानंतरही परिस्थिती जैसे असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

वाहने धुण्याचे सर्व्हिस सेंटर
घणसोली येथील महापालिकेच्या गुणाले तलावाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी १८ हजार रुपये मासिक पगारावर दोन कंत्राटी सुरक्षारक्षक नेमण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, तेथे त्यांचा पत्ताच नसल्यामुळे दर रविवारी कार, दुचाकी टेम्पो, वाहने धुतली जातात. त्यामुळे रसायने, ज्वालाग्राही पदार्थ आणि इंधन तलावात मिसळून पाणी दूषित होत असते. 
निर्माल्य कुंड असून, भाविकांनी त्यात टाकलेले निर्माल्य तलावात मिसळून पाण्याला दुर्गंधी येते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत संपूर्ण शहरात ‘स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई’ असे स्वच्छतेचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने लाखो रुपये खर्चून नोड्स आणि गावठाणात ठिकठिकाणी रंगरंगोटीचे काम सुरू आहे. 
मात्र, तलावाच्या दूषित सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नाक तोंड दाबून जावे लागत आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या वतीने ५५ लाख रुपयांची निविदा काढून स्थापत्य विभागाच्या वतीने तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांच्या देखरेखीखाली या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. 
मात्र, महापालिकेकडून दोन सुरक्षारक्षक नेमण्यात येऊनही ते केवळ कागदोपत्री हजेरीपटावर आहेत की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 

गुणाले तलाव तळीरामांचा अड्डा
या तलावांची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा सुरक्षारक्षक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तर तळीराम येथे दारूच्या बाटल्या घेऊन दारू पीत असतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तसेच महापालिकेने तलावाच्या सुशोभीकरणामध्ये बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

घणसोली परिसरातील तलावांची पाहणी करून, आवश्यक साफसफाई संदर्भात महापालिकेला अहवाल पाठविला जाईल. सुरक्षारक्षकाच्या बाबतीत चौकशी केली जाईल.
- महेंद्रसिंग ठोके, 
विभाग अधिकारी, घणसोली.

Web Title: Gunale Lake has become a washing center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.