कांदे, बटाट्याच्या आडून गुटखा विक्री; नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:14 PM2021-04-29T23:14:01+5:302021-04-29T23:14:13+5:30

टपरी चालकावर कारवाई; नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

Gutkha sales under onions, potatoes | कांदे, बटाट्याच्या आडून गुटखा विक्री; नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

कांदे, बटाट्याच्या आडून गुटखा विक्री; नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

Next

नवी मुंबई : अत्यावश्यक सुविधेच्या नावाखाली कांदे, बटाटेच्या आडून गुटखा विक्री करणाऱ्या टपरी चालकावर कोपर खैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या टपरी चालकाविरोधात स्थानिकांनी अनेकदा पालिकेकडे देखील तक्रार केली होती; परंतु नाममात्र कारवाई करून त्याला सूट दिली जात होती. अखेर गुरुवारी नागरिकांनीच त्याठिकाणच्या अवैध धंद्याचा भंडाफोड केला. 

कोपर खैरणे सेक्टर १४ येथे अत्यावश्यक सुविधेच्या नावाखाली ही टपरी चालवली जात होती. त्याठिकाणी गुटख्यासह इतर काही अमली पदार्थदेखील विकले जात होते. यामुळे सकाळ -संध्याकाळ या टपरीच्या आवारात गर्दुल्यांची गर्दी जमत होती. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत होता. हे गर्दुले त्याच आवारात रात्री उशिरापर्यंत दबा धरून बसलेले असत. यामुळे उघडपणे तक्रार करणाऱ्यांना असुरक्षित वाटत होते. त्यामुळे रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनमार्फत पालिका व पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्या आधारे पालिकेने काही दिवसांपूर्वी कारवाईचा दिखावा केला.

मात्र, त्यानंतरही तिथे दर्शनी भागात कांदे, बटाटे विक्रीसाठी ठेवून आतील भागात टपरी चालवली जात होती. गुरुवारी सकाळी परिसरातील रहिवासी प्रताप महाडिक यांनी हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेल्या तरुणाची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला गुटखा, सिगारेट व अमली पदार्थाच्या काही पुड्या आढळून आल्या. याबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त करत सदर टपरी चालकावर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली.

दरम्यान ज्या गाळ्यात ही टपरी चालवली जात आहे, त्या जागेचा भाडेकरारदेखील झालेला नसल्याचे समजते. त्यामुळे अवैधरीत्या टपरीसाठी जागा भाड्याने देणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी होत आहे. टपरी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेविका भारती पाटील यांनी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी परिसरात गर्दुल्यांचा होणारा वावर टाळण्यासाठी गस्त वाढवण्याची देखील मागणी केली. 

Web Title: Gutkha sales under onions, potatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.