नवी मुंबई - गुन्हे शाखा पोलिसांनी तळोजा येथून प्रतिबंधित गुटखा व गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन असा ७ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकून हि कारवाई करण्यात आली आहे.
तळोजा परिसरातील तोंडरेगावामधील दुकानात गुटखा विकला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाला मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक पराग सोनवणे यांनी सहायक निरीक्षक अनिल देवळे, उपनिरीक्षक आकाश पाटील, दिनेश सावंत, दिनेश जोशी आदींचे पथक केले होते. या पथकाने मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास तोंडरे गावातील एका दुकानावर छापा टाकला. त्यामध्ये दुकानात काही प्रमाणात गुटखा साठा आढळून आला. त्याशिवाय दुकानासमोरच उभ्या असलेल्या गाडीमध्ये देखील लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांच्या हाती लागला. याबाबत दुकानदार देवेंद्र त्रिपाठी याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, मोहम्मद आतिफ खान (३२) हा गुटखा पुरवठा करत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तातडीने घोटगाव येथील मोहम्मद खान याच्या घरावर छापा टाकला असता त्याठिकाणी देखील गुटख्याचा साठा आढळून आला. त्यानुसार दोन ठिकाणावरून साडेतीन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व गुटखा साठवण्यासाठी वापरलेली कार असा एकूण ७ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी देवेंद्र त्रिपाठी व मोहम्मद आतिफ खान यांच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.