तळोजातून दोन लाखाचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई, घरात केला होता साठा
By सूर्यकांत वाघमारे | Published: May 20, 2023 03:57 PM2023-05-20T15:57:04+5:302023-05-20T15:57:37+5:30
तळोजामधील पेटाली गावात गुटख्याचा साठा व पुरवठा होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी तळोजा येथून दोन लाखाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून त्याच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाड्याच्या घरामध्ये त्याने या गुटख्याची साठवणूक केली होती.
तळोजामधील पेटाली गावात गुटख्याचा साठा व पुरवठा होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखा अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथल्या रोहिदास केणी चाळीतील एका घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये घरात गोण्यांमध्ये साठवणूक केलेला सुमारे २ लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.
उमेश कमटी (२५) याने सदर घर भाड्याने घेऊन त्याठिकाणी गुटख्याची साठवणूक केली होती. शिवाय त्याच्याकडून परिसरातील गुटखा विक्रेत्यांना त्याचा पुरवठा देखील केला जात होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.