नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील सलून, ब्युटी पार्लर बंद होते. अलीकडेच ही दुकाने सुरू करण्याची राज्य सरकारने सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देऊन परवानगी दिली आहे. नवी मुंबईतील ८० टक्के केशकर्तनालय व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली असली, तरी पूर्वीपेक्षा आता ग्राहकांना ३० ते ३५ टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहे. यानुसार, वातानुकूलित केशकर्तनालयात केसासाठी १५० तर दाढीसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत.
नवी मुंबई शहरात लहान-मोठी ७०० ते ८०० सलून व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यात ३० टक्के वातानुकूलित आणि सर्व सामान्यांना परवडेल, अशी ७० टक्के दुकाने आहेत. दुकानातील खुर्च्यांची संख्या कमी करून खुर्च्यामध्ये अंतर ठेवणे, मास्क, सॅनिटायझारचा वापर करणे, ग्राहक आणि सलून कारागीर यांना यूज अँड थ्रो पीपीई किट वापरणे, तसेच हँडग्लोज, डोक्याला पीपीई टोपी अशा प्रकारचा खर्च वाढत आहे. तो आम्हाला न परवडणारा आहे. त्यामुळे सलूनमध्ये दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊन काळात केशकर्तनालयात काम करणारे कारागीर त्यांच्या मूळगावी गेल्यामुळे पूर्वीसारखी या व्यवसायात कमाई होत नाही. त्यातच कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून आम्हाला एका ग्राहकासाठी पूर्वीपेक्षा ३० ते ३५ रुपये जादा खर्च येतो. त्यामुळे दरवाढ करावी लागत आहे.-नरेश गायकर, अध्यक्ष, नाभिक विकास फाउंडेशन, नवी मुंबई
गेल्या सहा महिन्यांत केशकर्तनालय व्यवसाय बंद असल्यामुळे दुकान मालकाला काही बँकांकडून कर्जे काढून भाडे देण्याची वेळ आमच्यावर आली. कारागिरांचा पगार परवडत नसल्यामुळे स्वतः काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. - हिदास गायकर, अध्यक्ष, हु. विरभाई कोतवाल नाभिक संस्था, घणसोली