- नामदेव मोरेनवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. शनिवारी पहाटे एपीएमसीत २७ वर्षांच्या तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या तरुण व्यावसायिकास कोरोनाची लागण झाली होती. कोपरखैरणेमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्या आजोबांचेही १२ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दहा दिवसांत घरात दोघांचा मृत्यू झाल्याने एपीएमसीसह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर शहरातील कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण झाले.
महापालिका कार्यक्षेत्रात १३ मार्चला पहिला रुग्ण सापडला. वाशीमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या फिलिपाइन्समधील नागरिकाला लागण झाली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असताना २५ मार्चला त्याचे निधन झाले. शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत जागा अपुरी पडत असल्याने वारकरी भवन, वाशीतील समाजमंदिर व पनवेलमधील इंडिया बुल्सच्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू केले आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ११०० बेडचे रुग्णालय तयार केले जात आहे. रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रुग्णांबरोबर मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब व श्वसनाचे आजार आहेत त्यांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. ५० पेक्षा जास्त वय असणाºया नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही जास्त होते; परंतु आता कोणताही आजार नसणाºया २० ते ४० वयोगटातील तरुणांचाही बळी जात आहे. सीवूडमधील डॉक्टरचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. डॉक्टरच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. एपीएमसीमधील जवळपास पाच व्यापाऱ्यांचा व कामगारासह वाहतूकदाराचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वाशीमध्ये राहणाºया व्यापाºयावर वेळेत उपचार होऊ न शकल्याने मृत्यू झाला होता. नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेतली नाही तर मृत्यूचे तांडव सुरूच राहण्याचीही भीती आहे.
उपचाराअभावी इतर आजारांमुळेही बळी
च्कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून इतर आजारांमुळेही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. सानपाडामध्ये डायलिसिस वेळेत उपलब्ध न झाल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कोपरखैरणेमध्ये ज्येष्ठ नगरसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.च्शहरातील अनेक रुग्णालय बंद आहेत. हृदयविकार व इतर गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी कुठे घेऊन जायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून रुग्णालय व्यवस्थापनांकडून असहकार्य सुरूच राहिले तर कोरोना व्यतिरिक्त आजारांनीही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
शवागृहात जागा अपुरी
एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी त्याची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. तोपर्यंत मृतदेह पालिकेच्या शवागृहात ठेवावा लागतो. शवागृहात जागा अपुरी पडत असून दाटीवाटीने मृतदेह ठेवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना निदर्शनास आली होती.
एपीएमसीमधील परिस्थिती गंभीर
नवी मुंबईमध्ये एपीएमसीमुळे सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. मार्केटमधील व्यापारी, कामगार, वाहतूकदार, सुरक्षारक्षक व इतर घटकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामुळे तुर्भे, कोपरखैरणे, नेरुळ, वाशी, घणसोलीमध्येही प्रादुर्भाव वाढला आहे. कांदा-बटाटा व भाजी मार्केटमधील व्यापाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.