एसटी आरक्षणातील निम्मेच पैसे परत, प्रवाशांमध्ये नाराजी, कर्मचा-यांबरोबर वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:49 AM2017-10-23T02:49:12+5:302017-10-23T02:49:18+5:30
एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत गावाला जाण्यासाठी आरक्षण केलेल्यांना गावाला जाता आले नाही. हे आरक्षण रद्द करण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती;
पनवेल : एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत गावाला जाण्यासाठी आरक्षण केलेल्यांना गावाला जाता आले नाही. हे आरक्षण रद्द करण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती; पण परतीचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना ५० टक्के परतावा मिळेल, असे सांगण्यात आल्याने प्रवासी व कर्मचाºयांमध्ये वाद निर्माण झाले. प्रवास न करताच पैसे बुडणार असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
दिवाळीत शाळांना व कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे प्रवासाचे बेत करतात. कोण कुटुंबासह गावाला जातात, तर कोणी फिरायला जातात. या वेळी गाड्यांना गर्दी असल्याने अनेक जण आरक्षण करताना परतीच्या प्रवासाचेही आरक्षण करतात. १७ ते २० आॅक्टोबर दरम्यान एसटी कामगारांच्या संपामुळे अनेकांना सुट्टी असूनही प्रवास करता आला नाही. त्यामुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांनी संप मिटल्यावर शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने आरक्षण तिकिटाचा परतावा घेण्यासाठी एसटी स्थानकात गर्दी केली होती.
आरक्षण परतावा देताना ४ दिवस ज्या गाड्या सुटल्या नाहीत त्याचा पूर्ण परतावा दिला जात होता; पण ज्यांचे परतीचे तिकीट रविवारचे होते त्यांना केवळ ५० टक्के परतावा दिला जात होता. त्यामुळे वाद निर्माण होत होते. एसटीच्या संगणकातील सॉफ्टवेअरमध्ये गाडी सुटली नाही तरच पैसे परत देण्याची तरतूद आहे. रविवारी गाडी सुटल्याने पूर्ण पैसे देता येत नसल्याचे कर्मचारी सांगत होते. आगारप्रमुखांना त्याबाबत प्रशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याने हजारो रुपये बुडणार म्हणून प्रवासी नाराजी व्यक्त करीत होते.
>१९ आॅक्टोबर रोजी मुंबई-कळंब गाडीचे जाण्यासाठी व रविवार २२ आॅक्टोबरचे परतीचे आरक्षण केले होते. एसटीच्या संपामुळे गावी जाता आले नाही. रविवारी आरक्षण रद्द करून परतावा घेण्यासाठी गेले असता, परतीचे आरक्षण आजचे असल्याने ५० टक्केच पैसे परत मिळतील, असे सांगण्यात आले. कळंबच्या तीन आरक्षित तिकिटासाठी २१०० रु पये आहेत. आमचे सगळे पैसे मिळायला हवेत.
- वैजयंती शितळे, प्रवासी
>संगणकातील सॉफ्टवेअरमुळे काही प्रॉब्लेम येत असतील, तर त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल. परतीचे आरक्षण केलेल्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतील.
- रंजितसिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ