ऐरोलीतील बांधकामांवर हातोडा
By admin | Published: January 13, 2017 06:30 AM2017-01-13T06:30:24+5:302017-01-13T06:30:24+5:30
सिडकोने शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी ऐरोली
नवी मुंबई : सिडकोने शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी ऐरोली परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून जवळपास तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. महापालिकेच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली.
ऐरोली सेक्टर १ येथे संजय भोसले यांनी ९४४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांवर बेकायदा बांधकाम उभारले होते. जोथ्यापर्यंत उभारलेले हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर सेक्टर २0 मधील एक अनधिकृत धार्मिक स्थळ, बेकायदा विरंगुळा केंद्र आणि उच्च विद्युत वाहिन्यांच्या खाली उभारण्यात आलेल्या बेकायदा दोन व्यापारी गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. याअंतर्गत जवळपास दीड हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मोकळा करण्यात आला. सेक्टर २0 डी येथील ५00 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिडकोचे मुख्य अनधिकृत बांधकाम नियंत्रक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर-२) गणेश झिने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
(प्रतिनिधी)