कळंबोली : मोठा खांदा वसाहतीत सिडकोने शुक्रवारी अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेऊन दहा घरांची चाळ जमीनदोस्त करण्यात आली. झोपडपट्टीसह खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील सिडकोच्या जागेत असलेले अनधिकृत वीटभट्टीवरही कारवाई करण्यात आली, यामुळे या भागातील बेकायदेशीर बांधकाम तसेच झोपडीधारकांचे धाबे दणाणले आहेत.मोठा खांदा सेक्टर १७ येथील सिडको भूखंडावर अनधिकृत चाळीचे बांधकाम करण्यात आले होते. गुरांचा गोठा, गॅरेज, त्याचबरोबर सहा घरांच्या चाळीवर शुक्रवारी सिडकोच्या अतिक्रमण विभागाने हातोडा मारला. त्याचबरोबर १०० झोपडींवरही कारवाई करण्यात आली. खांदेश्वर रेल्वे समोरील मोकळ्या भूखंडावर विटा बनवण्यात येत असत, यामुळे मोठ्या प्रमाणात सेक्टर २५ येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. विटांच्या धुरामुळे हवा दूषित होऊन डोळ्यांना खाज, जळजळणे असे आजार जडत असून या वीटभट्टी बंद कराव्यात, अशा तक्रारी येत असल्याने सिडकोकडून या वीटभट्टीवरही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर याच भूखंडावर डोंबारी खेळ, कार्यक्रमात फेटे बांधणारे लोक व त्यांचे कुटुंबीय झोपडी उभारून राहत आहेत. त्याच्याही झोपडींवर कारवाई करण्यात आली. बांधकाम नियंत्रक विशाल ढगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक नियंत्रक अमोल देशमुख, भूमापक विनोद भुसावळे यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मोहीम हाती घेतली. दोन पोकलेन, कामगार, ट्रक, जीप गाड्या असा मोठा ताफा घेऊन पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम तसेच झोपडींवर कारवाई करण्यात आली.
मोठा खांदातील बांधकामावर हातोडा; दहा घरांची चाळ जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:48 AM