हुक्का पार्लर पबसह ४१ हॉटेलच्या अतिक्रमणांवर हातोडा
By नामदेव मोरे | Published: July 1, 2024 06:39 PM2024-07-01T18:39:45+5:302024-07-01T18:40:15+5:30
पोलिसांसह महानगरपालिकेची मोहीम : रात्री दहा ते पहाटे ४ पर्यंत सुरू होती कारवाई
नवी मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नवी मुंबई महानगरपालिका व पोलिसांनी शहरातील हुक्का पार्लर, बार, पबच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केली आहे. रविवारी रात्री १० पासून पहाटे ४ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागातील ४१ अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला. यामुळे अनधिकृत बांधकाम करणारांचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. झोपड्या, अनधिकृत इमारतीबरोबर हॉटेल चालकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करून दंडही वसूल केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच अवैध व्यवसाय करणारांवर कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर नवी मुंबईमधील हाॅटेल, बार, पब, लॉज, हुक्का पार्लरविरोधात पोलिस व महानगरपालिकेने संयुक्त मोहीम सुरू केली आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त डा. राहूल गेठे यांनी रात्री दहा वाजता एकाच वेळी बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली व घणसोली विभागात मोहीम सुरू केली. अनेक हाॅटेल चालकांनी मार्जीनल स्पेसचा व्यवसायासाठी वापर सुरू केला होता. पावसाळी शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम करून त्याचा व्यावसायीक वापर करण्यात येत होता. या सर्वांच्या अतिक्रमणांवर सरसकट कारवाई करण्यात आली.
पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेल चालकांनी बांधलेले शेड, वाढीव बांधकाम काढून टाकण्यात आले. रात्री सुरू झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमण करणारांचे धाबे दणाणले आहे. शहरातील हॉटेल चालकांची सर्व अतिक्रमणे हटवेपर्यंत मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. कारवाई दरम्यान स्वत: आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त डॉ. राहूल गेठे शहरभर भिरून कारवाईचा आढावा घेत होते. याशिवाय विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, डॉ. अमोल पालवे, सागर मोरे, सुनिल काठोळे, संजय तायडे, अशोक आहिरेही रात्रीभर कारवाईवर लक्ष ठेवून होते.
नवी मुंबईमधील हॉटेलसह सर्व प्रकारच्या अतिक्रमणांविरोधात नियमीत कारवाई केली जात आहे. रविवारी रात्री बेलापूर ते ऐरोली दरम्यान ४१ हॉटेल, पब, हुक्कापार्लरव कारवाई केली असून ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त महानगरपालिका
महानगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल, बारच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी आवश्यक तो बंदोबस्त पुरविण्यात येत आहे.
- पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
कारवाई करण्यात आलेली हॉटेल
बेलापूर विभाग
व्हीआयपी बार
धूम नाईट
नाईट ॲंगल
कबाना
बेबो
स्टार नाईट
लक्ष्मी हॉटेल,
महेश हॉटेल
अश्विथ हॉटेल
स्पाईस ऑफ शेड
घाटी अड्डा
ब्रु हाऊस कॅफे
रूड लॉन्च
निमंत्रण हॉटेल
बहाणा
कॅफे नाईटिन
बार मिनिस्ट्री
बार स्टॉक एक्सचेंज
नॉर्दन स्पाइसेस
कॉफी बाय डी बेला
दि लव्ह ॲंड लाटे
सुवर्डस कॅफे
मालवण तडका
नेरूळ विभाग
साई दरबार हॉटेल
भारती बार
गंगासागर जॉल
सिल्व्हर पॅलेस कॅफे
शानदार हुक्का पार्लर शिरवणे
सत्यम लॉज शिरवणे
वाशी विभाग
हॉटेल गोल्डन सुट्स
टेरेझा वाशी प्लाझा
अंबर रेस्टॉरंट
कोपरखैरणे विभाग
आदर्श बार सेक्टर १ ए
घणसोली विभाग
एमएच ४३ रेस्टॉरंट ॲंड बार
मोनार्क रेस्टॉरंट व बार
सीएनपी पंपावरील अनधिकृत होर्डींग
मल्लीका बार व रेस्टॉरंट
मिडलँड हॉटेल रेस्टॉरंट
ऐरोली विभाग
सेक्टर १ मधील अनधिकृ शेड
ऐरोली नाक्यावरील चायनीस हॉटेलचे अतिक्रमण
सेक्टर १९ मधील कृष्णा हॉटेल