अनधिकृत इमारतीवर हातोडा; कोपरी गावात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:31 AM2020-10-10T00:31:41+5:302020-10-10T00:31:44+5:30
नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाची धडक मोहीम
नवी मुंबई : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, तुर्भे विभागात कोपरी गावात नव्याने अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या एका चारमजली इमारतींवर शुक्रवारी दुपारी कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी गावातील सेक्टर २६ येथील भूखंड क्र.५० ए, येथे बांधकाम सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली.
सध्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष कोरोनाच्या नियंत्रणाकडे लागले आहे. याचाच फायदा घेत, नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांना ऊत आल्याचे चित्र पाहावयास मिळते. सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून गावठाणात नवीन अनधिकृत बांधकामांचे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू असल्यामुळे, भूमाफिया आणि विकासक दलालांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी कोपरी गावातील कारवाईसाठी तुर्भे अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधीक्षक अधिकारी पुंडलिक लाटे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्त ही कारवाई करण्यात आली. एक जेसीबी, डम्पर, सुरक्षा रक्षक आणि मजूर असा मोठा फौजफाटा होता.
तुर्भे विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी मोबाइल बंद ठेवल्यामुळे कारवाई संदर्भात त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.