घणसोलीत अनधिकृत इमारतींवर हातोडा, पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:07 AM2018-07-03T04:07:02+5:302018-07-03T04:07:12+5:30
घणसोली गावातील दोन अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज दुपारी कारवाई केली. या इमारतींना महापालिकेच्या वतीने दोनदा नोटिसा बजावल्या होत्या.
नवी मुंबई : घणसोली गावातील दोन अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज दुपारी कारवाई केली. या इमारतींना महापालिकेच्या वतीने दोनदा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र नोटिसीला उत्तर न देण्यात आल्याने धडक कारवाई करून बांधकाम पाडले होते. अलीकडेच २७ जून रोजी घणसोली विभागातील ११ अनधिकृत बांधकामे आणि दोन मोबाइल टॉवर्सवर रबाले पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यानुसार एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असताना त्यात कारवाई केलेल्या दोन इमारतींचा समावेश आहे.
महापालिका आयुक्त एन.रामास्वामी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त मोहन डगावकर, उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. गोठीवली खदान तलावाजवळ जागा मालक जितुसिंग यांचे आरसीसी फुटिंगचे चालू बांधकाम आणि घणसोली गावातील महादेव वाडी येथील जमीन मालक अवतारसिंग मेहरा आणि बिल्डर विकास शांताराम चव्हाण यांच्या तीन मजली इमारतीवर पालिकेच्या अतिक्र मण विभागाने हातोडा मारून कारवाई केली. या कारवाईला ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होणार होता. मात्र घटनास्थळी रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजमहेंद्र वाळदकर उपस्थित असल्यामुळे कारवाईला वेग आल्याने इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही अनधिकृत इमारतींच्या मालक आणि बिल्डरांवर पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईला अडथळा येऊ नये म्हणून मोकळ्या जागेतील ब्रेकर मशीन,तसेच २५ मजूर, सुरक्षा रक्षक,एक जेसीबी आणि दोन ट्रक असा फौजफाटा उपस्थित होता.