नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी दुपारी घणसोली गावातील अर्जुनवाडी आणि शिवाजी महाराज तलाव पाळी येथे नव्याने सुरू असलेल्या एकूण दोन अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारून बांधकामे निष्कासित करून कारवाई केली.
घणसोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव पाळी आणि अर्जुनवाडी अशा दोन ठिकाणी नव्याने अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू होते. नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली अतिक्रमण विभागाने या परिसरातील दोन ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्तात एमआरटीपी ५४ अन्वये कारवाई करून बांधकामे निष्कासित केली. घणसोली शिवाजी महाराज तलावाशेजारी विकासक प्रसाद शेट्टी यांचे अनधिकृत आरसीसी इमारतीच्या फुटिंगचे काम सुरू होते. तर अर्जुनवाडी येथे अशोककुमार गुप्ता आणि अब्दुल सत्तार यांचे नवीन आरसीसी बांधकाम जेसीबी आणि ब्रेकरच्या मदतीने तोडण्यात आले.
महापलिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार, परिमंडळ २ चे उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभागाचे सहायक आयुक्त महेंद्रसिंग ठोके, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे, वरिष्ठ लिपिक विष्णू धनावडे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. एक जेसीबी, १२ मजूर, एक ब्रेकर, अतिक्रमण विभागातील २५ पोलीस अधिकारी, सुरक्षारक्षक आणि कर्मचारी असा फौजफाटा कारवाईसाठी तैनात होता.
घणसोली विभागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या जमीन मालक आणि विकासक यांचा शोध घेऊन उभारण्यात आलेल्या अशा इमारतींवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई सुरू आहे. कारवाई सुरूच राहणार असून कारवाईला कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये. कारवाईदरम्यान कोणाचीही गय केली जाणार नाही. - रोहित ठाकरे, अतिक्रमण विभागप्रमुख, घणसोली