अनधिकृत बांधकामावर हातोडा; घणसोलीत संयुक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:13 AM2018-08-19T04:13:24+5:302018-08-19T04:13:49+5:30
विनापरवाना इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच पाडले
नवी मुंबई : घणसोली येथील अर्जुनवाडी परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले आहे. सदर जागामालकाला नोटीस बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सिडको व पालिकेच्या पथकाने त्या ठिकाणी संयुक्तरीत्या कारवाई केली. मात्र, सदर परिसरात अशा प्रकारची अनेक अनधिकृत बांधकामे असून, त्यावरही कारवाईची मागणी होत आहे.
पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार अनधिकृत नळजोडणी वेळी घणसोली परिसरातील अनधिकृत बांधकामेही समोर आली आहेत. ही बांधकामे सुरू असताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात चाळी व इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यावर कारवाईची मागणी होत असताना अर्जुनवाडी येथील संतोष चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणी इमारत उभारणीसाठी जागेचे खोदकाम करून पायाभरणीचे काम सुरू होते, त्यासाठी कसलीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याने ते बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यानंतरही बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिका व
सिडकोच्या पथकाने संयुक्तरीत्या त्या ठिकाणी कारवाई केली, यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
घणसोली गावठाण परिसरात इतरही अनधिकृत चाळी व इमारती पाहायला मिळत आहेत. त्यापैकी काही बांधकामांवर यापूर्वी कारवाई झाल्यानंतरही ती पुन्हा उभी राहिलेली आहेत. त्याकडे दोन्ही प्रशासनाचे कारवाईत दुर्लक्ष होत असल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.