मुक्या जीवांसाठी सरसावले हात
By admin | Published: March 26, 2016 02:26 AM2016-03-26T02:26:56+5:302016-03-26T02:26:56+5:30
पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा मनुष्याने बळकावल्याने पशुप्राण्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. वाशीतील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने पशुपक्ष्यांच्या मायेचा आधार देऊन
नवी मुंबई : पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा मनुष्याने बळकावल्याने पशुप्राण्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. वाशीतील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने पशुपक्ष्यांच्या मायेचा आधार देऊन त्यांचावर मोफत उपचार केले जातात. वर्षभरात या संस्थेच्या वतीने पाच हजारांहून अधिक पशुपक्ष्यांचे प्राण वाचविले असून, त्यांना हक्काचा निवारा मिळवून दिला आहे. जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास या संस्थेचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जाऊन मोफत उपचार करतात.
वाढते शहरीकरण, त्याबरोबरीने वाढणारे प्रदूषण, झाडांची कत्तल करून उभारल्या जाणाऱ्या टोलेजंग इमारती अशा अनेक कारणांमुळे प्राण्यांचा बळी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाशी परिसरात राहणारा सागर सावला या तरुणाने पशुंच्या रक्षणासाठी भूमी जीवदया ही संकल्पना सर्वांसमोर उभी केली आणि आज याच संस्थेमार्फत हजारो मुक्या जीवांना नवीने आयुष्य देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राघवजी वाघजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै २०१४ साली भूमी जीवदया संवर्धन संस्थेची स्थापना करण्यात आली. सरपटणारे प्राणी, गाय, बैल, म्हैस तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
नवी मुंबई शहरात पशू वैद्यकीय रुग्णालय नसल्याने या ठिकाणी एक सर्व सोयीसुविधांयुक्त रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असून, भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. नुकताच या संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेचा शुभारंभ केला असून, मुक्या जीवांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस ही सेवा कार्यरत राहणार असल्याची माहिती सागर सावला यांनी दिली. दुखापत झालेल्या प्राण्यांना आमच्या केंद्रापर्यंत आणण्यास या रुग्णवाहिकेचा वापर केला जाणार आहे.