रिक्षावाल्यांपुढे आरटीओने टेकले हात
By admin | Published: June 13, 2017 03:40 AM2017-06-13T03:40:29+5:302017-06-13T03:40:29+5:30
शहरातील अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मागणी होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध संघटनांच्या आडून या अनधिकृत रिक्षा चालत
- सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मागणी होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध संघटनांच्या आडून या अनधिकृत रिक्षा चालत असून त्यांना राजकीय पाठबळ देखील मिळत असल्याचे समजते. यामुळे रिक्षाचालकांची दादागिरी वाढत चालली असून त्यांच्यापुढे आरटीओने देखील हात टेकल्याचे दिसत आहे.
सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर भर देण्याची गरज असतानाही नवी मुंबईत मात्र दिवसेंदिवस खासगी रिक्षांचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरातील अधिकृत रिक्षांच्या दुप्पट संख्येने परवाना नसलेल्या अनधिकृत रिक्षा चालत आहेत. काही जण गुन्हेगारी हालचालीच्या उद्देशाने रिक्षाचालक बनले असून, काहींनी बेरोजगारीला पर्याय म्हणून रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला आहे. याचाच गैरफायदा घेत काहींनी परवाना नसलेल्या अनधिकृत रिक्षा भाड्याने देण्याचा देखील व्यवसाय मांडला आहे. त्यानुसार शहरात अनधिकृत (बोगस) रिक्षा चालक व मालकांची टोळी सक्रिय झाली आहे. तर राजकीय वरदहस्त लाभत असल्यामुळे त्यांच्याकडून प्रवाशांना तसेच अधिकृत रिक्षाचालकांना वेठीस धरले जात आहे. यासंबंधी काही अधिकृत रिक्षाचालक संघटनांसह प्रवाशांनी देखील आरटीओकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रारीनंतर ठरावीक जणांवर कारवाई केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती असते. यामुळे नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर, सारसोळे गाव, घणसोली रेल्वे स्थानकासमोर, सीवूड अशा ठिकाणी अधिकृत - अनधिकृत रिक्षाचालकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. भविष्यात अनधिकृत रिक्षाचालकांकडून संपूर्ण शहर वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच शहरातील अनधिकृत रिक्षांचे जाळे मोडीत काढण्याची मागणी होत आहे. यापूर्वी पुणे, ठाणे येथे रिक्षाचालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. असाच उपक्रम स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्याद्वारे अधिकृत रिक्षाची सहज ओळख पटेल. शिवाय रात्रीच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या प्रवाशाला चालकाविषयीची माहिती सहज उपलब्ध होईल. परंतु शासनाकडून कोणताही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास विरोध करण्याचा रिक्षाचालकांनी पायंडा पाडला आहे. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटर, गणवेश, भाडे दर निश्चितीला रिक्षाचालकांनी विरोध केलेला आहे. त्याद्वारे अनधिकृत रिक्षाचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.
सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून साकारलेल्या खारघरमध्ये तर रिक्षाचालकांनी नियमच धाब्यावर बसवले आहेत. आरटीओने निश्चित केलेल्या दरांऐवजी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत आहे. हीच परिस्थिती वाशी, कोपरखैरणे, नेरुळ, सीवूड याठिकाणी पहायला मिळत आहे. शेअर भाडे आकारण्यासाठी मार्ग ठरवून दिलेले असतानाही त्याचे पालन होत नाही. तर एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे येण्याची मागणी केल्यास रिक्षाचालकाकडून दिवसा देखील हाफ रिटर्नच्या बहाण्याने जादा रकमेची मागणी केली जाते.
- प्रवाशांची अडवणूक करून रात्री १२ ऐवजी १0 वाजताच प्रवाशांकडून हाफ रिटर्न भाडे आकारणी केली जाते. त्याकरिता मीटरमध्ये बेकायदेशीररीत्या छेडछाड केली जात असल्याचा काहींचा आरोप आहे. यापूर्वी असे काही प्रकार उघडकीस देखील आलेले आहेत.
- रिक्षासाठी आवश्यक ठिकाणी थांबे निश्चित करून देण्यात आले आहेत. परंतु बेशिस्त रिक्षाचालकांनी शहरातील सर्व बस थांब्यावरच रिक्षास्टँड तयार केले आहेत. यामुळे प्रवाशांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
- काही रिक्षा थांब्यावर रात्रीच्या वेळी दारूच्या पार्ट्या रंगतात. रात्रीच्या वेळी मद्यपान अथवा नशा करून काही जण रिक्षा चालवत असल्याने त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
- शहरातील सर्व विनापरवाना अनधिकृत रिक्षांवर आरटीओकडून कारवाई होणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रवासी वेठीस धरले जात आहेत.