कळंबोली : चोवीस तास महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दक्ष राहणाºया शीघ्र कृती दलाच्या जवानांना सण-उत्सवासाठी सुटी मिळत नाही. त्यांना ‘लोकमत’ सखी मंचच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी राख्या बांधून बंधुत्वाचे नाते जोडले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने संपूर्ण कॅम्पसमध्ये बहीण-भावाच्या पवित्र नात्याच्या लहरी गुंजल्या.जातीय दंगली नियंत्रणात आणण्यासाठी शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. तळोजा १०२ क्र मांकाची बटालियन असून त्यामध्ये एकूण १४०० जवानांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांची धुरा खांद्यावर असलेल्या या बटालियनला सतत सतर्कराहावे लागते. निवडणुका, सण, उत्सव, नैसर्गिक आपत्तीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. या काळात त्यांना अधिक दक्ष राहावे लागते. त्यामुळे या दलातील जवान आणि अधिकाºयांना सुटी मिळत नाही. याच कारणामुळे त्यांना सण-उत्सव साजरा करता येत नाही.राष्ट्र हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ते सदैव कर्तव्यासाठी सज्ज असतात. देश हे त्यांचे घर आणि देशवासीय कुटुंबीय या भावनेतून हे जवान काम करीत असतात. याच जवानांमुळे आपण सुरक्षित असून त्यांच्या प्रती आपलेही काही कर्तव्य आहे, या विचारातून ‘लोकमत’ने सखी मंचच्या माध्यमातून शुक्रवारी रक्षाबंधन कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.यावेळी अपर्णा कांबळे, नीलम आंधळे, लीना सावंत, चंचला बनकर, सरोज पवार व इतर सखी मंचच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. या भगिनींनी आरएएफच्या जवानांचे औक्षण करून यशस्वी भवचा टिळा लावून त्यांना राखी बांधली. त्यामध्ये कमांडंट आर.डब्लू. धावा, उप कमांडंट हेमंत कुमार, सहायक कमांडंट मकदुस अलम, रमेश वर्मा, स्वतंत्रकुमार हेही अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, डॉ. नविन मिश्रा, डॉ. रूपम तिवारी उपस्थित होते.
जवानांच्या हातात सखी मंचचे ‘सुरक्षा’बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:54 AM