नवी मुंबई : संकटमोचन, बलोपासनेसह बुद्धीची देवता म्हणूनही ज्याकडे पाहिले जाते अशा महाबली हनुमानाची जयंती नवी मुंबई शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. पवनपुत्र हनुमान की जय, संकटमोचन हनुमान की जय, अशा घोषणांनी शहर व परिसर दुमदुमून गेला होता. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शहरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण, स्तोत्र पठण, महाआरती, महारुद्र अभिषेक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सीबीडी येथील अलबेला हनुमान मंदिराच्या वतीने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजविलेली पालखी, जन्मकाळ सोहळा, सुंठवडा वाटप आणि हनुमान स्तोत्र अशा भक्तिपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. भाविकांनी श्री हनुमंताला रुईचा हार, पंचामृत आणि तेल वाहिले. बेलापूर गावात दीडशे वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या रामनवमी उत्सवाची सांगता हनुमान जयंतीने झाली. आठवडाभर या ठिकाणी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सीवूड्स, नेरुळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली या परिसरांमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली.घणसोली गावात हनुमान जयंती उत्सवघणसोली देवस्थान संस्थेच्या वतीने हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वाडा, पालघर येथील ह.भ.प संगीता काटोळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यंदाचे ११२ वर्ष होते. या वर्षीचा पालखीचा मान कौलआळीला होता. प्रत्येक सात वर्षांनी प्रत्येक आळीला हा पालखीचा मान मिळतो, अशी माहिती माजी नगरसेवक दीपक दगडू पाटील यांनी दिली. नेरुळ गावातील हनुमान मंदिरात १८३२ सालापासून उत्सव साजरा केला जात आहे. मंगळवारी संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली. तर तुर्भे नाका येथे हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती साजरी
By admin | Published: April 12, 2017 3:46 AM