मधुकर ठाकूर/उरण : रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २६ जानेवारी २०२४ पर्यंत जेएनपीएकडून देण्यात आलेल्या १०.०८ हेक्टर जागेचे सातबारा उतारे वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या नावे करून देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध करुन सातबारा नावे करो अथवा न करो ४ फेब्रुवारीपासून जागेचा ताबा घेऊन २५६ कुटुंबांनी नवीन जागेत राहायला जाण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.ग्रामस्थांच्या निर्णयामुळे मात्र प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मागील ३८ वर्षांपासून जेएनपीए बंदरामुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही.याविरोधात ग्रामस्थांचा केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार संघर्ष सुरू आहे. मागील ३८ वर्षात ५२५ पेक्षा अधिक बैठका झाल्या आहेत.शेकडो वेळा चर्चाही घडल्या आहेत. मात्र त्यानंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी तीन वेळा जेएनपीए समुद्र चॅनल रोखुन बंदरातील कंटेनर मालाची वाहतूकच रोखुन आपली नाराजी व्यक्त केली होती.
मध्यंतरीच्या काळात जेएनपीए व जिल्हा प्रशासनाने वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी जसखार व फुंण्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुमारे १०.०८ हेक्टर क्षेत्रावर पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते.जागा विकसित करुन देण्यासाठी जेएनपीएने ६४ कोटींचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला आहे.मात्र मागील तीन वर्षांपासून पुनर्वसनाच्या जागेचे घोंगडे भिजत पडले आहे.
त्यानंतर ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर पुनर्वसनाचे काम त्वरित करण्यासाठी जेएनपीएने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी जेएनपीएने मंजूर केलेल्या जागेचे सातबारा उतारे २६ जानेवारी २०२४ पुर्वी त्यांच्या नावाने करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे कोणत्याही कामांची अद्यापही पुर्तता केली नसल्याने वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची २६ जानेवारी रोजी बैठक आयोजित केली होती.हनुमान मंदिरात ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसनासाठी घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी जेएनपीए आणि जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा तीव्र शब्दात निषेध केला. पुनर्वसनासाठी दिलेल्या जागेचे सातबारा उतारे ग्रामस्थांच्या नावे करो अथवा न करो ४ फेब्रुवारीपासून २५६ कुटुंब जसखार व फुंण्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंजूर करण्यात आलेल्या जागेचा ताबा घेऊन स्थलांतर करतील आणि घरे बांधण्यास सुरुवात करतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.अशी माहिती ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मात्र जेएनपीए आणि जिल्हा प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.