नवी मुंबई : विस्तारित डम्पिंग ग्राउंडसाठी येथील हनुमान नगर वसाहतीला जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत; परंतु येथील एकाही घराला हात लावू देणार नाही, असा इशारा बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे. डिसेंबर २०१५ पर्यंतची घरे नियमित करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. ही वसाहत ४० वर्षे जुनी आहे, त्यामुळे येथील घरांना पाठविलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला केले आहे.
तुर्भे येथील क्षेपणभूमीच्या विस्तारासाठी महसूल विभागाची ३४ एकर जमीन महापालिकेला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे; परंतु प्रस्तावित करण्यात आलेल्या जमिनीपैकी काही हेक्टर क्षेत्रफळावर हनुमान नगर ही वसाहत आहे. आजमितीस या ठिकाणी सुमारे दहा हजार रहिवासी राहतात. महसूल आणि वन विभागाकडून डम्पिंगसाठी प्रस्तावित केलेली ३४ एकर जमीन महापालिकेला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यानुसार या जमिनीवर उभारलेल्या घरांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचे तीव्र पडसाद येथील रहिवाशांत उमटले आहेत. विस्तारित क्षेपणभूमीचा प्रकल्प झाला पाहिजे; परंतु त्यासाठी येथील गरीब जनतेला बेघर करणे न्यायाचे ठरणार नाही, असे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेचे आवाहनक्षेपणभूमीच्या पुढील टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या ३४ एकर जागा देण्यास राज्य शासनाने त्यास मान्यता दिली आहे. परंतु, एकूणच संबंधित जागेवरील संरक्षित केलेल्या निवासी झोपड्या वगळूनच उर्वरित जागा हस्तांतरित करून घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या संदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी केले आहे.