प्राची सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्कफळांचा राजा बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून, एरव्ही मे महिन्यात मंदावणारी आवक यंदा दुपटीहून अधिक झाली आहे. कोकणच्या हापूस आंब्याच्या पेटीचे दरही १०० रुपयांनी घसरले असून, ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. दिवसभरात ५४ हजार ३२२ पेट्या कोकणी हापूसची आवक झाली आहे, तर ६२ हजार ३६० इतकी कर्नाटकी आंब्याची आवक झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत कर्नाटकी हापूसची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा आंबा स्वस्त असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला ४११ ट्रक आणि टेम्पोमधून आंब्याची आवक होत आहे. कोकणी हापूस आंब्याची पेटी ६०० ते २००० रुपयांना उपलब्ध आहे, तर मागील वर्षी हेच दर १००० ते ४००० इतके होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हापूसच्या आंब्याच्या दरात १०० ते १२० रुपयांची घट झाली आहे. अक्षय्यतृतीयेनंतर आंब्याची आवक आणखी वाढल्याचे पाहायला मिळते. कर्नाटकी हापूसलाही बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हा आंबा ३५ ते ५५ रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत दक्षिणेकडील या आंब्याची मागणी तिपटीने वाढली आहे. दिवसाला २० ते २२ हजार पेट्यांची आवक होणारा हा दक्षिणेकडील आंब्याची सध्या ६५ ते ६८ हजार पेट्या इतकी आवक होत आहे. बदामी ३० ते ५० रुपये किलो, लालबाग २० रुपये किलो, तोतापुरी १५ रुपये किलो आणि केसर ८० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. दक्षिणेकडून येणारा हापूस हलक्या प्रतिचा आहे; परंतु त्याचा भाव कमी असल्याने व्यापारी तो आंबा खरेदी करून घेऊन जात आहेत. किरकोळ बाजारात कोकणी हापूस आंब्याची पेटी ७०० ते २,५०० रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यंदा आंब्याची चव दोन महिने आधीच चाखायला मिळाली असून, मे अखेरीस आवक मंदावण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकी हापूसची आवक वाढली आहे. पुढील दोन आठवडे आवक कायम राहील.- सीताराम कावरके, उपसचिव व बाजार समिती अधिकारी
हापूसच्या दरात घसरण
By admin | Published: May 06, 2017 6:04 AM