नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ३१,६८० विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात तब्बल २१ कोटी ९६ लाख ४९ हजार जमा करण्यात आलेे असल्यामुळे विद्यार्थ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या वतीने शहरातील मनपा व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१९-२० या आर्थिक वर्षातील शिष्यवृत्तीचे वाटप रखडले होते. पालक व लोकप्रतिनिधींनीही शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळावी, अशी मागणी केली होती. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात यावे, अशा सूचना प्रशानास दिल्या होत्या. दिवाळीपूर्वी शिष्यवृत्ती दिली नाही तर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या सुट्टीच्या दरम्यानही कामकाज सुरू ठेवावे लागेल, अशा शब्दांत निर्देश दिले होते.
शिष्यवृत्ती देण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करता यावी, यासाठी अर्जांच्या छाननीकरता अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या मार्फत समाजविकास विभागास दिल्या होत्या. समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील यांनी विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने १५ दिवस अविश्रांत परिश्रम घेऊन सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा केली आहे. पालिकेने दिवाळीच्या अगोदर शिष्यवृत्ती दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनामुळे अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. रखडलेली शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.