नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात; शहरात कडक बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:13 AM2019-01-01T01:13:26+5:302019-01-01T01:17:57+5:30

पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहर रोषणाईने उजळून निघाले होते. पामबीच रोडवरील पालिका मुख्यालयासमोर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

Happy new year; Strict settlement in the city | नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात; शहरात कडक बंदोबस्त

नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात; शहरात कडक बंदोबस्त

googlenewsNext

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहर रोषणाईने उजळून निघाले होते. पामबीच रोडवरील पालिका मुख्यालयासमोर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. हॉटेलसह फार्महाउसही हाउसफुल्ल असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हॉटेल व पबमध्ये विशेष संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वाशी, नेरुळ व सीबीडीमधील काही पब्समध्ये सायंकाळपासून तरुणांनी गर्दी केली होती. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन केले होते. १२ वाजता फटाक्यांची आतशबाजी व घोषणाबाजीमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. पनवेल व उरण परिसरामध्ये कलावंत, नेते व उद्योगपतींची फार्महाउस आहेत. या ठिकाणीही पार्ट्यांचे आयोजन केले होते. तीनही शहरांमधील प्रत्येक हॉटेलबाहेर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. वृक्षांवर केलेली रोषणाई सर्वांचेच वेधून घेत होती. नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापन दिन १ जानेवारीला असतो, यामुळे पालिका मुख्यालयाच्या इमारतीवरही आकर्षक रोषणाई केली होती. पालिका मुख्यालयाबाहेरील रोषणाई पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. मुख्यालयासमोर फटाक्यांची आतशबाजी करून नवीन वर्ष साजरे करण्याची प्रथा शहरात रूढ होऊ लागली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. सर्व प्रमूख चौकांमध्ये दुचाकी व कारचालकांची तपासणी केली जात होती. मद्यपी चालकांवर कारवाईही करण्यात येत होती. हॉटेल व पबमध्ये साध्या वेशातील पोलीसही लक्ष ठेवून होते. रात्री १० पर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. पार्ट्यांमुळे तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्यामुळे अनेक सामाजिक संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

लग्नाच्या मुहूर्ताने पार्टीचा मुहूर्त चुकला
सोमवारी लग्नाचाही मुहूर्त असल्याने अनेक उपवर मुलामुलींनी थर्टीफर्स्टच्या दिवशी विवाहबंधनात अडकण्याचा बेत आखला होता, त्यानुसार शहरात ठिकठिकाणी लग्नसोहळे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी, थर्टीफर्स्टच्या बॅचलर पार्टीच्या बेतात असणाऱ्यांना सहकुटुंब लग्नसोहळ्यात हजेरी लावावी लागली, यामुळे लग्नसोहळ्याचा मुहूर्त साधण्याच्या प्रयत्नात अनेकांचा थर्टीफर्स्टचा यंदाचा मुहूर्त चुकला.

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवायांवर भर
मद्यपान करून वाहन चालवणाºयांमुळे अपघाताच्या घटना घडतात, यामुळे अशांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करून थेट तुरुंगात टाकण्याचा पवित्रा नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. गतवर्षी थर्टीफर्स्टला ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या ५८८ कारवाया झाल्या होत्या. यंदाही मोठ्या प्रमाणात कारवाईच्या उद्देशाने संपूर्ण पोलीस आयुक्तालयात दोन्ही परिमंडळचे पोलीस व वाहतूक पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता, त्याकरिता सर्वाधिक बार असलेल्या सीबीडी, वाशी, एपीएमसी विभागांसह इतरही ठिकाणी पोलीस दबा धरून होते; परंतु कारवाईच्या भीतीने अनेकांनी मद्यपानाच्या पार्ट्यांकडे पाठ फिरवल्याने रात्री उशिरापर्यंत बार व हॉटेलमालक ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.

पोलिसांचे मानले आभार
नेरुळमधील नीलेश दौंडकर, पंकज पोळ, स्वप्निल खैरे, स्वप्निल पानसरे, आकाश भोसले व इतर तरुण प्रत्येक वर्षी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात व रात्रभर पोलिसांना चहा व पाणी पुरविण्याचे काम करत आहेत, या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले.

कीर्तनाचे आयोजन
नेरुळमध्ये सामाजिक कार्यकर्ते दिलीप आमले ८ वर्षांपासून ३१ डिसेंबरला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत असतात. तरुणांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून कीर्तनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Happy new year; Strict settlement in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.