हापूसची पहिली पेटी एपीएमसीत दाखल; प्रतिडझन दोन हजार रुपये बाजारभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:30 AM2020-01-31T01:30:34+5:302020-01-31T01:30:59+5:30
फळांच्या व्यापारामध्ये आंब्याला, विशेषत: हापूसला विशेष महत्त्व आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) गुरुवारी देवगडमधून हापूसच्या १२ पेट्यांची आवक झाली आहे. एपीएमसीमध्ये प्रतिडझन दोन हजार रुपये या दराने आंब्याची विक्री झाली. गतवर्षीपेक्षा पहिली पेटी तब्बल तीन महिने उशिरा दाखल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
फळांच्या व्यापारामध्ये आंब्याला, विशेषत: हापूसला विशेष महत्त्व आहे. मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशातील सर्वांत जास्त आंबा विक्री होत असते. गत हंगामामध्ये ५ नोव्हेंबर २०१८ ला पहिली पेटी विक्रीसाठी आली होती. पहिल्या पेटीवर त्या वर्षी हंगाम कसा राहील याचा अंदाज बांधला जातो. या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे मोहोर उशिरा आला असून, पहिली पेटी मार्केटमध्ये येण्यासही उशीर झाला. सिंधुदुर्ग तालुक्यामधील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावामधील शेतकरी अरविंद वाळके यांनी हापूसच्या
१२ पेट्या विक्रीसाठी पाठविल्या आहेत. संजय पानसरे यांच्याकडे आंबा विक्रीसाठी आला आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये प्रतिडझन २ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. याविषयी माहिती देताना संजय पानसरे यांनी सांगितले,
कोकणासह सर्वत्र या वर्षी मोहोर उशिरा आला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्येही आंबा मोहोर उशिरा आला असल्यामुळे नियमित हंगाम मार्चच्या अखेरपासून सुरू होईल. १५ ते २० एप्रिलदरम्यान आंबा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.