- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सरासरी ७० हजार पेक्षा जास्त पेट्यांची आवक सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ३०० ते ९०० रुपये डझन तर किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते २००० रुपये दराने विक्री होत आहे. एप्रिलमध्ये आवक कमी होणार असल्यामुळे यंदा हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहण्याची अधिक शक्यता आहे.
बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा व्यापारातून ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असते. यंदा आंबा हंगाम लवकर सुरू झाला आहे. गुरुवारी रामनवमी असूनही हापूसच्या ४३,६२२ व इतर आंब्याच्या २९ हजार ६९९ अशा एकूण ७३ हजार २९१ पेट्यांची आवक झाली. प्रतिदिन ७० हजारांहून अधिक पेट्यांची आवक सुरू आहे. सर्वाधिक आवक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू आहे.
एप्रिलमध्ये रत्नागिरीमधील आवक वाढणार आहे. होलसेल मार्केटमध्ये ४ ते ८ डझन पेटीला १५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. प्रतिडझन ३०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. मुंबई, नवी मुंबईच्या किरकोळ मार्केटमध्ये हापूस ७०० पासून २००० रुपये दराने विकला जात आहे.
५ एप्रिलनंतर महिनाभर आवक कमी?
५ एप्रिलनंतर महिनाभर आंब्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षी हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे महिन्यात आवक वाढली तरच दर नियंत्रणात येऊ शकतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की आंबा हंगाम तेजीत आहे. कोकणच्या हापूससह दक्षिणेतील राज्यातून आंब्याची आवक सुरू आहे. यावर्षी मे महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.