मलावी देशातील हापूस आंबा विक्रीसाठी आज येणार मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:58 PM2019-11-11T22:58:01+5:302019-11-11T22:58:27+5:30
दक्षिण पूर्व अफ्रिकेतील मलावी देशातील हापूस आंबा विक्रीसाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत आहे.
नवी मुंबई- दक्षिण पूर्व अफ्रिकेतील मलावी देशातील हापूस आंबा विक्रीसाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत आहे. 2011 पासून कोकणातून हापूसचे बियाणे मलावी मध्ये नेण्यास सुरवात झाली असून गतवर्षीपासून आंबे विक्रीसाठी महाराष्ट्रात पाठविण्यास सुरवात झाली आहे.
मलावी हा दक्षिण पूर्व अफ्रिकेतील दिड कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. या देशातील हवामान कोकणाप्रमाणे आहे. 2011 मध्ये तेथील शेतक-यांनी दापोली मधून हापूस चे बियाणे मलावी मध्ये नेण्यास सुरवात केली. तेथील तेथील 600 एकर जमिनीवर 60 हजार रोपांची टप्प्या टप्याने लागवड करण्यात आली. या रोपांना आंबे लागू लागले आहेत. गतवर्षी ही डिसेंबर महिन्यात हापूस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आला होता. 1300 ते 1800 रूपये डजन दराने भाव मिळाला होता.
यावर्षी ही मलावी मधील हापूस आंबा नोव्हेंबर मध्येच मुंबईत विक्रीसाठी येत आहे. पहिल्या टप्प्यातील हापूस मंगळवारी मुंबई मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती व्यापा-यांनी दिली आहे . यावर्षी पावसामुळे कोकणातील हापूस चा मोहर उशीरा येण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर विदेशातील हापूस विक्रीसाठी येत असल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.