नवी मुंबई : कोकणच्या हापूस प्रमाणे जुन्नर चा हापूस आंबाही एक महिना अगोदरच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुहूर्ताची पेटी दाखल झाली असून जूनपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. प्रत्येक वर्षी मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जुन्नरचा हापूस मार्केटमध्ये दाखल होत असतो. यावर्षी काही भागात लवकर पिक आले असून मंंगळवारी आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठविण्यात आला आहे.
जुन्नरच्या पश्चीम भागात आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. या आंब्याला शेकडो वर्षांची परंपरा असून त्याला भौगोलीक मानांकन प्राप्त व्हावे यासाठीही शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवनेरी हापूस या नावाने ओळख मिळविण्याचा प्रयत्न आहे. बाजार समितीमध्ये दोन डजनचे चार बॉक्स पहिल्या दिवशी आले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला या आंब्याची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली. या आंब्याला किती भाव मिळणार याकडे मार्केटचे लक्ष लागले असून साधारणत: ८०० ते ९०० रुपये डजन भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकणसह दक्षिणेतील राज्यातून ७२ हजार पेट्यांची आवकबाजार समितीमध्ये कोकणातून २३२९५ पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ३०० ते ११०० रुपये डजन दराने हापूस विकला जात आहे. दक्षीणेतील राज्यातून ४८ हजार ८२० पेट्या व बॉक्सची आवक झाली असून लालबाग व इतर आंबे ८० ते १३० रुपये किलो दराने विकले जात आहेत.